Narayan Rane on Sanjay Raut: 'राऊत म्हणालेले, ...तर साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे कपडे उतरविन'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:48 IST2022-02-16T16:48:30+5:302022-02-16T16:48:50+5:30
Narayan Rane on Sanjay Raut press conference: राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले, असा सवालही त्यांनी केला. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही टोला नारायण राणे यांनी लगावला.

Narayan Rane on Sanjay Raut: 'राऊत म्हणालेले, ...तर साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे कपडे उतरविन'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे वेळ आल्यावर बाहेर काढणार. राऊत हे शिवसेनेचे नाहीत, पूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना शिवसेना संपविण्यास सांगितले आहे. ठाकरेंना हटव शिवसेनेची खूर्ची तुला देतो असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. तसेच सत्तास्थापनेच्या त्या रात्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेव्हा सिल्व्हर ओकवर शरद पवारांना भेटण्यास गेले तेव्हा राऊत हे एकटेच तिथे होते, असा आरोपही राणे यांनी केले.
साहेबांचे आणि उद्धवचे मी कपडे उतरवीन, मला पद दिले नाही तर पाहून घेईन असे हे संजय राऊत एकदा बोलले होते. याचा साक्षीदार माझ्याकडे आहे. त्याला हवा तेव्हा समोर आणतो. माझ्यासमोर साहेबांबद्दल बोलला असता तर तिथेच आडवा केला असता. आता पदे मिळालीत म्हणून हे पैसे कमवायला आलेत. संजय राऊत हे पगारी नेता आहेत, सामनामध्ये काम करतात, अशी टीकाही राणे यांनी केली.
संजय राऊत यांना काल घाम फुटला. प्रवीण राऊतने ईडीला जी मुलाखत दिली त्यानंतर याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्याला आता अटक होणार हे समजले आहे. अनिल परब यांनाही अटक होणार आहे. आज सेना भवन आठवले का, असा सवालही राणे यांनी केला. राऊत यांनी कधी कोणाच्या कानाखाली वाजविल्याची बातमी ऐकली आहे का, रग लागते त्यासाठी. याच्यात रक्तच नाही, अशा शब्दांत राणे यांनी टिका केली. आम्ही मंत्री आहोत, ईडी सीबीआयकडे जाऊन बसलो तर राऊत यांची पळता भुई थोडी होईल असा इशारा राणे यांनी दिला.
राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले, असा सवालही त्यांनी केला. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही त्यांनी टोला लगावला. यावेळी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना राऊत यांच्याबद्दल काय वाटायचे याबाबतची कात्रणेही राणे यांनी वाचून दाखविली.