त्यांचे तारे जमीनपर होते; आम्ही सारे जमीनपर केला, चित्रपटाचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री शिंदेंची कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:29 IST2026-03-12T10:28:55+5:302026-03-12T10:29:28+5:30
लोकमतच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार’ सोहळ्यानिमित्त राजकारणातील तळपता तारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट क्षेत्रातील शुक्रतारा अभिनेता आमिर खान एकत्र आले आहेत.

त्यांचे तारे जमीनपर होते; आम्ही सारे जमीनपर केला, चित्रपटाचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री शिंदेंची कोपरखळी
मुंबई : लोकमतच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार’ सोहळ्यानिमित्त राजकारणातील तळपता तारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट क्षेत्रातील शुक्रतारा अभिनेता आमिर खान एकत्र आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे व्यक्तिमत्त्व कुणाच्याही सहज पकडीत न येणारे असे तेल लावलेले पहेलवान आहे. आमिर खान यांनी ‘दंगल’सारखा कुस्तीवर आधारित चित्रपट केला असला, तरी देवेंद्र फडणवीस यांना सहज ‘धोबीपछाड’ देणे कोणालाही शक्य नाही असे राजकारणातील पहेलवान आहेत. तरुणपणी त्यांनी मॉडेलिंग केले आहे. त्यामुळे ते राजकारणी झाले नसते तर कदाचित चित्रपटसृष्टीतही चमकले असते. सुपर मॉडेल किंवा सुपर हिरो झाले असते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार सोहळा मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी चीफ ज्युरी म्हणून मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून काम करणे हा देखील एक मोठा पुरस्कारच आहे. लोकमतने नावाप्रमाणेच लोकांचे मत लक्षात घेऊन 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार निश्चित केले आहेत. ही निवड खऱ्या अर्थाने लोकशाही प्रक्रियेतून झालेली आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. सरकारनेही त्यांना महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च सन्मान दिला आहे. त्यांचे कर्तृत्व महान असल्याने अनेक मोठे पुरस्कार त्यांच्या आयुष्यात आले. तेच या पुरस्कारांचे खऱ्या अर्थाने मानकरी आहेत, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
'सारे जमीन पर'ही हिट झाला
आमिर यांनी ‘तारे जमीन पर’ काढला. आम्ही विधानसभा निवडणुकीत ‘सारे जमीन पर’ काढला. तुमचा आणि आमचा दोघांचाही चित्रपट हिट झाला. कारण, लोकमत आणि जनताही आमच्या पाठीशी होती. लोकमतसारखी माध्यमसंस्था सामाजिक जबाबदारीने काम करत आहे. हे केवळ वृत्तपत्र नाही, तर एक प्रेरणादायी संस्था आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
शेलार यांनाही बोलवा...
लोकमतने अत्यंत चाणाक्षपणे राजकारण्यांपैकी मला आणि सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांना ज्युरी म्हणून जबाबदारी दिली. नगरविकास मंत्री असताना दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मला ‘बेस्ट पॉलिटिशियन ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला. पण, मित्र शेलार यांना अजून पुरस्कार मिळालेला नाही. त्यांना पुरस्कार मिळू नये म्हणून कदाचित ज्युरीमध्ये ठेवले असावे. पण, पुढील वर्षी शेलार यांना ज्युरी न करता थेट पुरस्कार घ्यायला बोलवा, अशी आमची अपेक्षा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
‘लोकमत’च्या कार्याचा गौरव
मॅरेथॉन स्पर्धा, उद्योजकांसाठी परिसंवाद, युवकांना मार्गदर्शन, दिवाळी पहाट, मतदार जागृती अभियान असे विविध कार्यक्रम राबवून एक माध्यम म्हणून लोकमत आपली जबाबदारी पार पडत आहे. समाज घडविणे हे माध्यमाचे काम असून लोकमत तेच काम करत आहे. यासाठी लोकमत मीडिया समूहाचे विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, ऋषी दर्डा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.