युद्धाची झळ गावखेड्यापर्यंत! तेल, चटणी आणि भाकरीही महागली; ज्वारीची ५,३०० रुपयांपर्यंत झेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:23 IST2026-04-06T12:23:02+5:302026-04-06T12:23:38+5:30
मंगळवेढा बाजारपेठेत ज्वारीला विक्रमी दर

युद्धाची झळ गावखेड्यापर्यंत! तेल, चटणी आणि भाकरीही महागली; ज्वारीची ५,३०० रुपयांपर्यंत झेप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तेल, चटणी आणि कांदा भाकरी यावर दिवस काढणाऱ्या सर्वसामान्याला आता या वस्तूंच्याही महागाईची झळ बसू लागली आहे. ज्वारीचे उत्पादन घटले तर मिरचीला अवकाळीचा दणका बसला. इराण अमेरिका युध्दामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीने आघाडी घेतली आहे. इतिहासात प्रथमच ज्वारीला प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ५०० रुपयांपासून ते ५ हजार ३०० पर्यंत उच्चांकी दर मिळाला आहे.
यंदा गहू, मका, बाजरी यांसारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळत असून, ‘मालदांडी ’ ज्वारीला विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. उत्तम प्रतीच्या ज्वारीला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, सरासरी दर्जाच्या ज्वारीस ४५०० रुपयांपासून भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी मालाची गुणवत्ता टिकवून ठेवली तर पुढील काही काळही ज्वारीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून अपेक्षित दर न मिळाल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी नाराज होते. मात्र, यंदा परिस्थितीती बदलली असून ज्वारीला चांगले दिवस आले आहेत.
चांगल्या प्रतीच्या मालाला स्पर्धात्मक दर
बाजारातील स्थिती स्पष्ट करताना मंगळवेढ्यातील आडत व्यापारी पांडुरंग नकाते म्हणाले, यंदा ज्वारीचे उत्पादन कमी आहे. मात्र, दर्जात मोठी सुधारणा दिसत आहे. बाजारात मागणी सातत्याने वाढत असून, चांगल्या प्रतीच्या मालाला स्पर्धात्मक दर मिळत आहेत.
खाद्यतेलाच्या दरात वाढ
धान्यासोबतच तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. सोयाबीनच्या तेलात तब्बल ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. आधी तेल १३० ते १३५ रुपये किलो होते.
आता १७० रुपये किलो झाले आहे. तसेच शेंगदाणा तेलाचे दर ३० रुपयांनी वाढले आहे. आधी १७० रुपये किलो असलेले दर २०० रुपये झाले आहे.
मिरची किलोमागे शंभर रुपयांनी वाढली
एकीकडे उन्हाचापार वाढल्याने नागरिकांना चटके सहन करावे लागत असताना दुसरीकडे लाल मिरचीने ग्राहकांचे तोंड होरपळून निघाले आहे. गेल्या आठवड्यापेक्षा मिरचीच्या दरात सरासरी प्रतिकिलो शंभर रुपयांची वाढ झाली आहे. खरीप हंगामातील मिरचीला पावसाने फटका बसला आणि त्यानंतरच्या हंगामावरही अवकाळीचे पाणी पडल्याने आवक कमी झाली आहे.
आपल्याकडे पावसाळी बेगमी म्हणून जानेवारी-फेब्रुवारीपासून चटणी करून ठेवण्याची पद्धत आहे. मार्चनंतर हे प्रमाण वाढत जाते. मात्र, यंदा खरीप हंगामातच परतीच्या पावसाने मिरची पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा बाजारात लाल मिरची पहिल्यापासूनच तेजीत आहे. आपल्याकडे ‘ब्याडगी’लाच अधिक पसंती दिली जाते. मे महिन्यात मिरचीला सर्वाधिक मागणी असते. मात्र यंदा तेवढी आवक शक्य नाही. त्यामुळे, एप्रिलपेक्षा मे महिन्यात किलोमागे किमान ५० रुपयांची वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे.