संघाच्या ‘सोशल’ प्रोफाईलवर तिरंगा, पहिल्यांदाच बदल केल्यामुळे सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 06:23 IST2022-08-14T06:22:42+5:302022-08-14T06:23:05+5:30
आरएसएसचे प्रचार विभागाचे सहप्रभारी नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, ‘संघ आपल्या सर्व कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे.’

संघाच्या ‘सोशल’ प्रोफाईलवर तिरंगा, पहिल्यांदाच बदल केल्यामुळे सर्वत्र चर्चा
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) स्वातंत्र्य दिनापूर्वी शुक्रवारी आपल्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरील प्रोफाईल पिक्चर बदलले आहेत. या खात्यांवरील भगवा ध्वज हटवून तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे.
आरएसएसने पहिल्यांदाच असा बदल केल्यामुळे याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम घोषित केल्यानंतर विरोधी पक्षांनी आरएसएसवर हल्ला केला होता. आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आपल्या
सोशल मीडिया खात्याच्या डीपीवर तिरंगा ध्वज लावला आहे. आरएसएसचे प्रचार विभागाचे सहप्रभारी नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, ‘संघ आपल्या सर्व कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे.’ स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल सरकार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे.
विरोधकांनी उपस्थित केला होता सवाल
‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत आरएसएस आपल्या सोशल मीडिया खात्यांवर तिरंगा ध्वज कधी लावणार, असा सवाल विरोधी पक्षांकडून केला जात होता. त्यावर आरएसएसचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी टीकेला उत्तर देताना म्हटले होते की, अशा बाबींचे राजकारण व्हायला नको. ‘हर घर तिरंगा’ आणि ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या दोन्ही कार्यक्रमांना आरएसएसने याआधीच समर्थन दिले आहे.