Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:12 IST2025-12-15T13:11:57+5:302025-12-15T13:12:14+5:30
Maharashtra Municipal Elections 2025 Date: राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या घोषणेबाबत दाट शक्यता वर्तवती जात आहे.

Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
मुंबई - गेल्या २-३ वर्षापासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांचे बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या प्रमुख महापालिकांसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा आज घोषित होतील अशी माहिती आहे. १५ डिसेंबरला दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही पत्रकार परिषद होईल. मागील अनेक दिवसांपासून कुठल्याही क्षणी महापालिका निवडणुका लागू शकतात अशी चर्चा होती. त्यामुळे आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होतोय का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे ही पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यात २९ महापालिका निवडणुका होणार आहेत. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुकांचा कार्यक्रम घ्यावा असा निर्देश सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर राज्यात नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र त्यानंतर राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही ठिकाणी निवडणुका रद्द करण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली. त्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाही लांबणीवर पडल्या. त्यात राज्यातील केवळ दोनच महापालिकांनी ५० टक्के राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणूक आधी घेता येणे सोपे जाईल हा विचार राज्य निवडणूक आयोग करत होते. महापालिका निवडणुकीत कुठलीही आठकाठी न टाकल्याने महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार का याची उत्सुकता आहे.
दुबार मतदारावरही होणार भाष्य?
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या घोषणेबाबत दाट शक्यता वर्तवती जात आहे. मात्र त्याशिवाय दुबार मतदारांवरूनही राज्य निवडणूक आयोग काय उत्तर देते का याचीही चर्चा आहे. ठाकरे बंधू यांनी मतदार यादीवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही यादीवर आक्षेप घेतले होते. त्यामुळे दुबार मतदारांवरून या पत्रकार परिषदेत भाष्य होते का हेदेखील पाहावे लागणार आहे.
दरम्यान, आज जर निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा केली तर पुढील ३५-४० दिवस हा कार्यक्रम चालेल. त्यामुळे जानेवारीच्या १६-२० तारखांमध्ये महापालिकेसाठी मतदान होऊ शकते. त्याशिवाय निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिताही लागू होईल. त्यामुळे जे काही भूमिपूजन, उद्घाटनांचे कार्यक्रम असतील ते सत्ताधाऱ्यांना थांबवावे लागतील. आचारसंहिता लागू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकांचा महासंग्राम आपल्याला पुढील महिनाभर पाहायला मिळू शकतो.