Uday Umesh Lalit Story: आजोबा निष्णात वकील, वडील न्यायाधीश, नातवाने सर्वोच्च पद गाठले; उदय उमेश लळीत कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 11:25 IST2022-08-05T10:17:38+5:302022-08-05T11:25:57+5:30
हरिभाई देवकरण प्रशालेत झाले शिक्षण : आजोबांपासून कुटुंबाचे सोलापुरात वास्तव्य

Uday Umesh Lalit Story: आजोबा निष्णात वकील, वडील न्यायाधीश, नातवाने सर्वोच्च पद गाठले; उदय उमेश लळीत कोण?
- रवींद्र देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय उमेश लळीत यांची शिफारस करण्यात आली असून ते सोलापूरचे सुपुत्र आहेत. शहरातील जुन्या ब्रिटिशकालीन हरिभाई देवकरण प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. हरिभाई देवकरण प्रशालेत न्या. उदय यांचे माध्यमिक शिक्षण झाले.
लळीत यांचे कुटुंब मूळचे कोकणातील. उदय लळीत यांचे आजोबा सोलापुरात वकिली करण्यासाठी आले अन् लळीत सोलापूरकर झाले. त्यांचे वडील उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश होते. ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी त्यांच्यासंबंधीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, माझ्या आजोबापासून लळीत कुटुंबाचा माने कुटुंबाशी संबंध. लळीत यांनी वकिली क्षेत्रात नाव कमावले होते. न्या. लळीत यांचे आजोबा अण्णासाहेब यांना शहरात मानसन्मान होता.
न्या. लळीत हे सरन्यायाधीश होणार असल्याचे वृत्त समजताच त्यांचे वर्गमित्र ॲड. भगवान वैद्य यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, आम्ही हरिभाईमध्ये एकत्र होतोच; पण दत्त चौकातील एक नंबर शाळेत आयाचित सरांच्या संस्कृत वर्गाला आणि लेले गुरुजींच्या क्लासला एकत्रच जायचो. शालेय जीवनात न्या. उदय हे अभ्यासात अत्यंत हुशार होते. प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करीत असत. घरातील परंपरेनुसार तेही कायद्याचे विद्यार्थी झाले आणि आज सरन्यायाधीश या सर्वोच्च पदावर ते पोहोचले, ही आनंदाची गोष्ट आहे.
लळित यांनी दिलेले तीन महत्त्वाचे निकाल
त्रिवार तलाकची पद्धती राज्यघटनाविरोधी आहे, असा ऐतिहासिक निर्णय पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने २०१७ मध्ये दिला होता. त्यात न्या. लळित यांचा समावेश होता.
पॉक्सो कायद्यांतर्गत एका खटल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्या. लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने रद्द केला होता.
केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाचे अधिकार त्रावणकोर येथील माजी संस्थानिकांच्या वंशजांना आहेत, असा महत्त्वपूर्ण निकाल न्या. लळित यांच्या खंडपीठाने दिला होता.
सकाळी ९.३०ला कोर्टात हजर
ॲड. वैद्य म्हणाले की, न्या. उदय हे सकाळी ९.३० वाजता न्यायालयात उपस्थित राहतात. वेळेबाबत ते अतिशय काटेकोर आहेत. कोर्टापुढे सध्या अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यांचा निपटारा लवकर व्हावा. यासाठी ते कोर्टात वेळेत पोहोचतात, असेही वैद्य यांनी सांगितले.
न्या. लळीत यांचे नागपूरशीही नाते
नागपूर : न्यायमूर्ती उदय लळीत यांचे नागपूरसोबत अगदी जवळचे संबंध आहेत. त्यांचे वडील उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते. त्यामुळे त्यांनी बालपणीची काही वर्षे नागपूरमध्ये घालविली आहेत. नागपुरातील वरिष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, न्या. लळीत यांचे वडील १९७३ ते १९७५ या काळात उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होते. ते सिव्हिल लाईन्स येथील सौदामिनी बंगल्यामध्ये राहत होते. त्यावेळी न्या. उदय लळीत शालेय शिक्षण घेत होते.