इटालियन फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच, प्राडाने केले मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:37 IST2025-06-28T13:37:25+5:302025-06-28T13:37:58+5:30

ललित गांधी यांची माहिती : महाराष्ट्र चेंबरच्या मागणीला प्रतिसाद

The slippers in the Italian fashion show were made by Kolhapuri, Prada accepted it | इटालियन फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच, प्राडाने केले मान्य

इटालियन फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच, प्राडाने केले मान्य

कोल्हापूर : प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. मेन्स फॅशन शोमध्ये याचे सादरीकरण झाले. त्या विरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरने तातडीने इटली येथील प्राडाचे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही कोल्हापुरी चप्पल असल्याचे जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली.

कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चपलेची जगभरात ओळख आहे. अलीकडेच प्राडा इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. तसेच मेन्स फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपलेचा वापर केला. ही चप्पल इटालियन असल्याचे भासविले. या प्रकाराने प्राडावर भारतीय सांस्कृतिक वारशाचा फायदा उठवण्याचा आरोप महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केला होता.

चेंबरने लक्ष घालण्याची कारागिरांची मागणी

प्राडा कंपनी कोल्हापुरीसारखी चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे तर, भारतीय कारागीर तीच चप्पल ४०० रुपयांत बनवतात. या संदर्भात कोल्हापुरातील चप्पल बनवणारे कारागिरांत नाराजी होती. राज्यातील काही कारागिरांनी या प्रकरणी महाराष्ट्र चेंबरने लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीकडे पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर प्राडाने ही चप्पल कोल्हापुरीच असल्याचे मान्य केले.

Web Title: The slippers in the Italian fashion show were made by Kolhapuri, Prada accepted it