मुंबई - आजच्या दिवशी १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलुमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, हुकूमशाही प्रवृत्ती फोफावली असून, ती लोकशाही व संविधान गिळंकृत करू पहात आहे. आज या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असून, देशाला घातक असलेल्या या प्रवृत्तीला ‘चलो जाव’चा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट क्रांती मैदाना पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. गवालिया टँक येथे स्वातंत्र्य चळवळ व ‘अंग्रेजो चले जाव’ ‘भारत छोडो’, आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा ताई गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजन भोसले, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, चरणसिंग सप्रा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर श्रीरंग बर्गे, श्रीकृष्ण सांगळे, ॲड. अमित कारंडे, मधू चव्हाण, भावना जैन, मोनिका जगताप, धनंजय शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आज महात्मा गांधींचा संदेश व देशाला स्वातंत्र कसे मिळाले याची आठवण सर्वांना झाली पाहिजे. स्वातंत्र्यासाठी मोठा लढा द्यावा लागला आणि मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे पण आज देशातील परिस्थिती पाहता पुन्हा एकदा ‘चले जाव’चा नारा देण्याची गरज असून देशात आज एका नव्या क्रांतीची गरज आहे. नागपूरची चिप थैमान घालत असून ती सर्व व्यवस्था करप्ट करत आहे, ती चिप लोकांच्या डोक्यात घसुवण्याचा प्रयत्न सुरु आहे. महात्मा गांधी यांचा खून करणारी प्रवृत्ती, स्त्री-पुरुष समानता नाकारणारी प्रवृत्ती व स्पृश-अस्पृशता माननाऱ्या प्रवृत्तीला गाडण्याची गरज आहे, असे आवाहन करत आज ही प्रवृत्ती ठेचली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.