संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास, १८, १९ जानेवारीला करणार मार्गदर्शन 

By यदू जोशी | Updated: January 4, 2025 12:26 IST2025-01-04T12:25:28+5:302025-01-04T12:26:48+5:30

मुंबईत १८ आणि १९ जानेवारीला त्यासाठी दिवसभर मॅरेथॉन बैठका होतील...

The Sangh will take classes from BJP ministers, will provide guidance on January 18th and 19th | संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास, १८, १९ जानेवारीला करणार मार्गदर्शन 

संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास, १८, १९ जानेवारीला करणार मार्गदर्शन 

यदु जोशी -

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी हे राज्यातील भाजपच्या मंत्र्यांचा दोन दिवस क्लास घेणार आहेत. आगामी पाच वर्षांमध्ये मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील आणि त्यासाठीचा रोडमॅप काय असावा, याबाबतचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

मुंबईत १८ आणि १९ जानेवारीला त्यासाठी दिवसभर मॅरेथॉन बैठका होतील. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकांना हजर असतील. राज्याचा कारभार कसा असावा, मंत्र्यांनी आपापल्या विभागातील कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, कोणत्या लोकाभिमुख योजनांना गती द्यावी याविषयी संघाच्या अपेक्षा काय आहेत, ते मंत्र्यांना सांगितले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे सर्व २० मंत्री बैठकांना हजर असतील. 

भाजपकडे असलेल्या खात्यांमध्ये विशेषत: आदिवासी विकास, ग्रामविकास, पशुसंवर्धन, उच्च शिक्षण, वने, कामगार, ओबीसी कल्याण, कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये संघ आणि संघ परिवाराचे मोठे कार्य आहे. सेवा क्षेत्रांमध्ये प्रत्येक खात्याचा अजेंडा काय असावा, याविषयीचे मार्गदर्शन मंत्र्यांना केले जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी संघाकडून प्रत्येक मंत्र्यांना लक्ष्य निर्धारित करून दिले जाईल आणि ते किती साध्य झाले याचा नियमितपणे आढावा घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सरकारची कामगिरी, वाटचाल याबाबत संघाच्या काही अपेक्षा आहेत, त्याविषयी मंत्र्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. संघाला अपेक्षित असलेले निर्णय व्हावेत आणि त्यासाठी जीआर काढले जावेत, अशीही अपेक्षा असेल. सरकारच्या माध्यमातून संघ आपला कोणता अजेंडा राबविणार याविषयी उत्सुकता असेल. 

प्रदेश भाजपचे अधिवेशन शिर्डीत 
प्रदेश भाजपचे अधिवेशन शिर्डी येथे १२ जानेवारीला होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करतील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने अधिवेशनाचा समारोप होणार आहे. या दिवशी भाजपच्या मंत्र्यांची एक बैठक शाह घेतील अशी शक्यता आहे.
 

Web Title: The Sangh will take classes from BJP ministers, will provide guidance on January 18th and 19th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.