दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त; विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:02 IST2025-07-25T10:01:37+5:302025-07-25T10:02:15+5:30
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळात रिक्त राहणार आहे.

दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त; विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
संदीप प्रधान
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळात रिक्त राहणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत ऑगस्ट महिनाअखेर संपत आहे. दुसऱ्या बाजूला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर उद्धवसेनेने दावा करत भास्कर जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र त्याबाबत अजून घोषणा झालेली नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथेच दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय होईल, असे संकेत आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेता या पदाकरिता उद्धवसेनेनी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र दिले आहे. मात्र जाधव यांचे नाव बहुदा भाजपला मान्य नाही. त्यामुळे जाधव यांच्या विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होत नसेल तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सोडू नये, असा मतप्रवाह पक्षात होता. मात्र दानवे हे कसे मूळचे भाजपचे निष्ठावंत आहेत, असा सूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी सभागृहात लावल्याने दानवे यांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका उद्धव ठाकरे यांनी टाळल्याचे समजते. त्यामुळे आता दानवे यांची मुदत संपल्यावर परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे.