'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:43 IST2025-07-06T13:41:42+5:302025-07-06T13:43:35+5:30
Nitin Gadkari on Indian Economy: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील गरीब आणि श्रीमंतामधील वाढत्या दरीबद्दल चिंता व्यक्त केली.

'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
Nitin Gadkari News: देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत्या दरीबद्दल केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. हळूहळू देशात गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती चालली आहे, अशी चिंता नितीन गडकरी व्यक्त केली. अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये. संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नागपूरमध्ये सीए विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी देशाची अर्थव्यवस्था, संपत्तीचे मोजक्या श्रीमंताकडे होत असलेले केंद्रीकरण या मुद्द्यांवरही बोट ठेवले.
नितीन गडकरी गरीब-श्रीमंत दरीबद्दल काय बोलले?
कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, "आता लोक हा प्रश्न विचारत आहे की, आपल्या विकासासाठी आर्थिक चिंतनाची गरज आहे. अमेरिकेने उदारमतवादी अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले. पण, ते मॉडेलही अयशस्वी ठरले आहे. आपल्या देशातही ही चर्चा आहे की, आपण काय करायला हवे?"
"आपले उद्दिष्ट हे आहे की, गरिबांची गरिबी दूर करणारा, तरुणांना रोजगार निर्मिती करणारा, देशाची संपत्ती वाढवणारा आर्थिक पर्याय आपल्याला हवा आहे. त्यामुळे साहजिकच नरसिंहराव आणि मनमोहन सिंगजी यांनी उदारमतवादी अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारले. हे स्वीकारले, पण आपल्याला विचार करावा लागेल की, अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये", अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली.
गरिबांची संख्या वाढतेय -नितीन गडकरी
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "हळूहळू गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होत चालले आहे. हे होता कामा नये. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे. आर्थिक स्थितीमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत, त्यात सीएची भूमिका खूप महत्त्वाची आहे."
भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, "जीडीपीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान समान नाहीये. जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा २२ ते २४ टक्के आहे. सेवा क्षेत्राचा ५२ ते ५४ टक्के, तर कृषि क्षेत्राचा वाटा फक्त १२ टक्के आहे. यात ६५ ते ७० टक्के ग्रामीण लोकसंख्या आहे."