पुन्हा एकदा प्रतिसरकार स्थापन करण्याची आवश्यकता, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:02 IST2024-12-05T12:01:14+5:302024-12-05T12:02:10+5:30
कुंडल येथे क्रांतिअग्रणी पुरस्काराचे वितरण : मराठीचा अभिमान बाळगा

पुन्हा एकदा प्रतिसरकार स्थापन करण्याची आवश्यकता, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत
कुंडल : आजचे राजकारण पाहता लोकांची डोकीच चालत नाहीत आणि आपलंही डोकं ठिकाणावर नाही. त्यामुळे आपण त्यांना पाहतोय आणि प्रमाण मानतो, असं आजचे राजकारण बघताना जाणवते आहे. आजचे राजकीय वातावरण जे हास्यास्पद झाले आहे. यासाठी या मातीतून लोक पुढे येऊन पुन्हा एकदा प्रतिसरकार स्थापन करण्याची गरज आहे, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडले.
कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त क्रांतिअग्रणी पुरस्कार डॉ. नेमाडे यांना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड हे अध्यक्षस्थानी होते. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे होते.
डॉ. नेमाडे म्हणाले, क्रांतीच्या या भूमीत अनेक प्रकारचे क्रांतिकारक आहेत. सर्वच क्षेत्रात या परिसराने क्रांती केली आहे. याच भूमीत जी. डी. बापू जन्मले आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार घेताना मला अभिमान वाटतो. या भागात नावीन्याची ओढ दिसून येते. जे होऊन गेले ते वैचारिक लोक इथ घडले कारण हे विचार या मातीत जन्मजात आहेत. आजच्या राजकारणात हाच विचार मागे पडला आहे. या परिसराने मला खूप मोठ्ठं देणं दिलं आहे. भवानराव पंतप्रतिनिधी यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. यातून या परिसराचे जे आजवर कोणाच्या पाहण्यात आले नसलेले पैलूही पुढे येतील.
आजही दारिद्र्य रस्त्यावर लोटांगण घालत असताना राजकीय लोक अनाठायी लाखोंचा खर्च करत आहेत, हे पाहून मी नेहमी अस्वस्थ होतो. आपल्याला मुळाकडे जाण्याची वृत्ती नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटत आहेत. यामुळे आपलं मूळ नष्ट होत आहे. मराठी ही भाषा अभिजात असताना आपल्या भाषेकडे दुर्लक्ष होते आहे. तिला "महाराष्ट्री" म्हटले जायचे ही भाषा संस्कृतपेक्षा ही जुनी आहे. मराठी भाषेतील बहुतांश काव्य हे महिलांनी लिहिले. इंग्रजी माध्यमातील कोणताही विद्यार्थी पुढे इंग्रजीचा प्राध्यापक होत नाही. जे प्राध्यापक आहेत ते मराठी किंवा इतर माध्यमात शिकलेले आहेत. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगा, असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.
अरुण लाड म्हणाले, चळवळीतून जे समाज घडवतात. त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आजवर कोणाही राजकारण्यांना किंवा सामाजिक भूमिका सोडणाऱ्यांना हा पुरस्कार दिला गेला नाही.
यावेळी ॲड. प्रकाश लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, उद्योजक उदय लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, सत्याविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, पी. पी. कुंभार, क्रांती महिला प्रतिष्ठानच्या धनश्री लाड, आदी उपस्थित होते.
नेमाडे हे उत्कृष्ट कवी : जब्बार पटेल
क्रांतिसिंह नाना पाटील व जी. डी. बापूंच्या नावाने उभारलेले स्मारक प्रत्येकाने पाहिले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते, तर आजचा आधुनिक महाराष्ट्र घडला नसता. भालचंद्र नेमाडे हे अभूतपूर्व समुद्र आहे. त्यामध्ये उडी मारली पाहिजे. नेमाडे यांनी कवितेतून स्त्रियांविषयी कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. नेमाडे हे उत्कृष्ट कवी आहेत. अशी त्यांची नव्याने ओळख निर्माण व्हावी, अशी अपेक्षा जब्बार पटेल यांनी भाषणात व्यक्त केली.