Uddhav Thackeray "पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही", उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:12 IST2023-07-10T13:04:41+5:302023-07-10T13:12:57+5:30
Uddhav Thackeray आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Uddhav Thackeray "पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही", उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. तसेच, शिवसेना हे पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचे काम निवडणूक आयोगाचे नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
सध्या सगळेजण पाहत आहेत, राजकारणात पक्ष फोडणे ही गोष्ट नवी नव्हती. पण, आता लोक पक्ष चोरत आहेत. पण, शिवसेना हे पक्षाचे नाव माझ्यासोबत राहील. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले होते. ते नाव मी कोणाला घेऊ देणार नाही. नाव देणं हा निवडणूक आयोगाचा आधिकारच नाही. निवडणूक चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकते, तो त्यांचा अधिकार आहे. पक्षाचे नाव माझंच आहे आणि ते माझ्याकडेच राहील. निवडणुकांदरम्यान नियमांचे पालन होत आहे की नाही, ते पाहणे त्यांचे काम आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा त्यांना अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
याचबरोबर, सध्या जाहीर सभेचा काळ नाही. त्यामुळे मी सभेसाठी फिरत नाही. कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी फिरत आहे. सर्व कार्यकर्त्यांना मातोश्रीवर भेटणे शक्य नाही. या आव्हानात्मक काळात कट्टर शिवसेना कार्यकर्त्यांना भेटत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. सध्या मी मुख्यमंत्री नाहीये, त्यामुळे त्यावर भाष्य करू शकत नाही. पण काल सामना पिक्चरमधील गाणं आठवलं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
'राइट टू रिकॉल' योजना
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे. पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला सत्तेत यायचे, आता खोक्यातून जन्माला येत आहे. तुम्ही मतदान कोणालाही करा सरकार माझंच येईल असं बोलायला लागले आणि तसा जर पायंडा पडला तर उद्या जो कोणी दमदाट्या किंवा पैशाचा खेळ करू शकतो तो राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा 'राइट टू रिकॉल' योजना मांडली आहे. मी निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधींनी चुक केली असेल, आमच्यासह जो कोणी करेल त्यांना परत बोलवण्याचा अधिकार द्यायला पाहिजे का? यावर देशात विचार व्हायला पाहिजे असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.