मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले मात्र विधानसभेला अनपेक्षित अपयशाला सामोरे जावे लागले. खासदार संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा साधला. त्याशिवाय विधानसभेला मविआच्या पराभवाला कारणीभूत कोण यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य करत चूक कबूल केली आहे. सगळ्या गोष्टीत हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलं.
जे तुम्ही लोकसभेला कमावलंत, ते विधानसभेला गमावलंत, फक्त सहा महिन्यात हे कसं घडले? असा प्रश्न राऊतांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळ्यांवर आता चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले, हे लोकांसमोर आलंय. लाडकी बहीणसारख्या आता फसव्या ठरलेल्या योजना याचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाली की स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू तू मै मै झाले, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
तसेच लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसले तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होते, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हते. ही चूक होती. ती पुढे सुधारली पाहिजे. ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. मविआत समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेले होते. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचे आहे हे आपलेपण होते. विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो मी पणा आला तेव्हा पराभव आला अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली.
निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हव्यात
दरम्यान, एवढं पाशवी बहुमत मिळाले पण जल्लोष कुठे झाला? अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हाऊन निघायला पाहिजे होता, तो अवाक् का झाला? ग्रामीण भागातले अनेक लोक म्हणतात, आम्ही ठरवून तुम्हाला मतदान केले तरी आमच्या गावात तुम्हाला इतकी मते कशी मिळाली माहिती नाही. पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात. ईव्हीएम हँकिंगचा मुद्दा वेगळा पण लोकशाहीत आरटीआयमध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर माझी माहितीही मिळाली पाहिजे. मतपत्रिकेवर मतदान व्हायला पाहिजे. मुळात ईव्हीएम का आणले, मतमोजणीचा वेळ वाचवायला, मग एकेक महिना निवडणूक प्रक्रिया चालते, ती वेळ का धरत नाही. अमेरिका, युरोपमध्येही बॅलेट पेपरवर मतदान होते ते देश आपल्यापेक्षा मागास आहेत का असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.