ऊन जरा जास्त आहे... मंगळवार ठरला सर्वांत उष्ण दिवस; महामुंबईला उन्हाचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:31 IST2025-02-26T09:31:50+5:302025-02-26T09:31:56+5:30
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आणखी काही दिवस तापमानाचा पारा चढा राहणार असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.

ऊन जरा जास्त आहे... मंगळवार ठरला सर्वांत उष्ण दिवस; महामुंबईला उन्हाचा तडाखा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या आठ वर्षांमध्ये फेब्रुवारी महिन्यातील मंगळवार हा सर्वाधिक उष्णतेचा दिवस म्हणून नोंद करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार मुंबईत ३६.८ अंश सेल्सिअस तापमान होते. आठ वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर हवामान खात्याने मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आणखी काही दिवस तापमानाचा पारा चढा राहणार असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांनी वाढत्या तापमानाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
उन्हामुळे एकीकडे घाम, तर त्यात प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड वाढली आहे. वाढत्या तापमानात आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याची गरज आहे. तसेच दुपारी उष्णता अधिक असल्याने या काळात बाहेर जाणे टाळवे, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवारी मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस तापमान ३७ ते ३८ अंश इतके राहण्याची शक्यता आहे.
मुलांची काळजी घ्या
सध्या परीक्षांचे दिवस आहेत. त्यामुळे मुलांना रोज शाळेतून ये-जा करताना या वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागत आहे.
या वातावरणात मुलांना भूक लागत नाही. त्यामुळे खाण्याच्या तक्रारी वाढतात. यासाठी मुलांना हलका आहार देणे गरजेचे आहे. तसेच मुबलक प्रमाणात पाणी गरजेचे आहे.
आरोग्यावर परिणाम
डिहायड्रेशन, चक्कर येणे, हात-पाय दुखणे, पोटात मळमळणे, मूत्रविकाराच्या समस्या, उलट्या, जुलाब
काय केले पाहिजे?
दररोज २-३ लीटर पाणी प्यावे. नारळपाणी, ताक, दही, लस्सी, फळाचा ज्यूस प्यावा. चक्कर आल्यास ओआरएस प्यावे.
वातावरण बदलामुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दिवसा गरम आणि रात्र थंड या वातावरणामुळे सुका खोकल्याच्या तक्रारी वाढतात. अशावेळी थंड पाणी पिणे टाळावे. तसेच आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. विनायक सावर्डेकर, औषधवैद्यक शास्त्र तज्ज्ञ, सेंट जॉर्जेस रुग्णालय.