पालकमंत्र्यांची वाहतूककोंडी! उलट्या दिशेने ताफा घुसला, सव्वाआठ तासांनी बैठकीला पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:22 IST2025-10-16T09:21:41+5:302025-10-16T09:22:04+5:30
विरारनंतर पालकमंत्र्यांना जिल्हा नियोजनच्या बैठकीत उपस्थित राहावे लागणार असल्याने पोलिसांनी त्यांना उलट्या दिशेने प्रवास करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या.

पालकमंत्र्यांची वाहतूककोंडी! उलट्या दिशेने ताफा घुसला, सव्वाआठ तासांनी बैठकीला पोहोचले
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडीचा जाच रोजचाच आहे. या महामार्गावर झालेले ५०० निरपराध मृत्यू आणि दररोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेले लोक एक दिवस रस्त्यावर उतरतील, अशी भीती पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली. आज मी वाहतूककोंडीत सापडलो असताना तो संताप मी नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहिला. त्यामुळे लोकांचा उद्रेक झाल्यास अनेक गोष्टी बेचिराख होतील, असेही ते म्हणाले.
पालकमंत्र्यांविरोधात समाजमाध्यमांवर नाराजी
विरारनंतर पालकमंत्र्यांना जिल्हा नियोजनच्या बैठकीत उपस्थित राहावे लागणार असल्याने पोलिसांनी त्यांना उलट्या दिशेने प्रवास करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. परंतु, मुंबईकडे सुरळीत सुरू असणारी वाहतूक सेवा पुन्हा ठप्प झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
सव्वाआठ तासांनी बैठकीला पोहोचले
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यासाठी घरातून पहाटे सहा वाजता निघालेले पालकमंत्री गणेश नाईक हे घोडबंदर ते वसईदरम्यान वाहतूककोंडीत सापडले. अखेर विरार ते सफाळे असा रोरो जलवाहतूक सेवेचा आधार घेत ते ८:१५ तासांनी बैठकीला पोहोचले. अशाप्रकारे पालघरवासीयांच्या वेदनांच्या झळा पालकमंत्र्यांना भोगाव्या लागल्या.
व्हीसीद्वारे चर्चा करून व्यक्त केली नाराजी
महामार्गावरील वाहतूक पोलिस विभागाच्या पोलिस अधीक्षक आणि मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे पोलिस उपायुक्तांशी व्हीसीद्वारे चर्चा करून नाईक यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या महामार्गावर आजपर्यंत सुमारे ५०० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, या वाहतूककोंडीमुळे एखादे लहान मूल आणि महिलेचा उपचारांअभावी होणारा मृत्यू हा महाराष्ट्राला शोभनीय नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुककोंडीचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांनाही सोसावा लागला. मंगळवारी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या १० ते १२ बसेस वाहतूककोंडीत अडकून पडल्या. यात काही दादर येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. दरम्यान, याप्रकरणी पालकमंत्र्यांनी वाहतुककोंडीचा स्वतः अनुभव घेतल्यानतंर बुधवारी विविध बैठकांमध्ये राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.