'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:04 IST2025-11-02T17:02:37+5:302025-11-02T17:04:27+5:30
फलटणमधील महिला आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत. याप्रकरणात विविध आरोप-प्रत्यारोप होत असताना याचा तपास एसआयटीकडे देण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा या तपासावर शंका उपस्थित केली आहे.
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
फलटणमधील महिला आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, सरकारने एसआयटी नेमण्याची घोषणा केली होती, मात्र आजवर एसआयटीची नियुक्तीच झालेली नाही.
त्याचबरोबर, तपास अधिकारी म्हणून नेमलेल्या अधिकाऱ्याचे शिक्षण फलटणमध्येच झाले आहे, तसेच त्यांच्यावर पूर्वीही काही गंभीर आरोप झाले असल्याचे अंधारे यांनी सांगितले. अशा परिस्थितीत तपास यंत्रणा निष्पक्ष आणि गतिमान पद्धतीने काम करू शकेल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे उद्या सकाळी १० वाजता फलटण पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना जाब विचारणार आहेत.
डॉ. संपदा मुंडे हत्या की आत्महत्या याचा गुंता वाढला आहे. या बाबतीत उच्च न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. तिने चार पानी पत्र लिहिले ती सुसाईड नोट लिहिणार नाही का? आम्हाला एसआयटी नको उच्च स्तरीय समितीची मागणी करत आहोत. एसआयटी नेमली जाते, एसआयटी राज्य सरकार नेमते. कालपासून भाजपा नेत्यांनी एसआयटी नेमल्या बद्दल आभार मानायला सुरुवात केली आहे. पण, तपास यंत्रणा प्रभावित होणार नाहीत, अशा व्यक्तींची नियुक्ती करण्याची मागणी करत आहोत, असंही अंधारे म्हणाल्या.
एसआयटी स्थापन करण्याची घोषणा
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन करण्याबाबतचा अधिकृत आदेश शनिवारी निघण्याची शक्यता असून या एसआयटीत कोणते अधिकारी असणार याबाबत उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने हातावर सुसाइड नोट लिहित आत्महत्या केली होती. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, तसेच पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. एका रुग्णाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर दबाव आल्याची तक्रारही तिने केली होती.