"छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून भरारी हा दिवस 'शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा होणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:10 IST2025-02-20T12:10:40+5:302025-02-20T12:10:40+5:30

आग्रा येथील लाल किल्ल्यावर सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

The day of Chhatrapati Shivaji Maharaj Agra will be celebrated as 'Shivchaturya Din' says Ashish Shelar | "छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून भरारी हा दिवस 'शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा होणार"

"छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून भरारी हा दिवस 'शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा होणार"

आग्र्याच्या लाल किल्ल्यातील पोलादी सुरक्षा भेदून, छत्रपती शिवाजी महाराजांनी नजर कैदेतून बाल संभाजीसह घेतलेली भरारी ही रोमांचकारी घटना असून या घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक कार्य विभाग तिथीनुसार "शिवचातुर्य दिन" म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली. शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. 

आशिष शेलार म्हणाले की, "ज्या ठिकाणी ‘परिंदा भी पर मार नही सकता‘ अशी सुरक्षा यंत्रणा होती, ते सुरक्षा कवच मोठ्या युक्तीने भेदून औरंगजेबाला त्याच्याच इलाख्यात जाऊन मारलेली चपराक म्हणजेच आग्र्याहून सुटका होय! शक्ती-युक्ती आणि चातुर्याची ही घटना संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक असल्याने, तिथीनुसार हा दिवस महाराष्ट्रात  "शिवचातुर्य दिन" म्हणुन साजरा करण्यात येणार आहे." 

या दिवशी राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन, महाराजांची युद्धनीती, गनिमी कावा आणि भक्ती - शक्ती - युक्ती यावर प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून तसेच चर्चासत्रे/परिसंवाद/हेरिटेज वॉक माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा महानाट्याचा विषय असल्याने, त्यांच्या कार्याचे विविध पैलू सांस्कृतिक माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न सांस्कृतिक कार्य विभाग करेल असंही त्यांनी पुढे सांगितलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विनोद पाटील, एस पी सिंग बाघेल, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार परिणय फुके, छावा चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे विकी कौशल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आग्रा येथील लाल किल्ल्यावर सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र बनवणार असल्याचं यावेळेस नमूद केलं.
 

Web Title: The day of Chhatrapati Shivaji Maharaj Agra will be celebrated as 'Shivchaturya Din' says Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.