'ज्या दिवशी परतफेड करेन, त्या दिवशी 'तो' व्हिडीओ डिलीट करेन'; नितेश राणेंचा इशारा कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 09:21 IST2025-04-11T09:20:23+5:302025-04-11T09:21:54+5:30
Nitesh Rane: नारायण राणे यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्या घटनेचा उल्लेख करत मंत्री नितेश राणे यांनी परतफेड करण्याचा इशारा दिला आहे.

'ज्या दिवशी परतफेड करेन, त्या दिवशी 'तो' व्हिडीओ डिलीट करेन'; नितेश राणेंचा इशारा कुणाला?
Nitesh Rane News: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात माजी मंत्री नारायण राणे यांना अटक झाली होती. नारायण राणे जेवत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्या घटनेचा उल्लेख करत कॅबिनेट नितेश राणे यांनी आता परतफेड करण्याची भाषा केली आहे. सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रात मंत्री असताना नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. २३ ऑगस्ट २०२१ रोजी ही घटना घडली होती. नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक विधान केलं होतं.
महाडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे म्हणाले होते की, 'स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्य दिन कोणता माहिती नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती', असे विधान राणेंनी केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. जेवण करत असतानाच राणेंना पोलिसांनी अटक केली होती.
परतफेड केल्यावर व्हिडीओ डिलीट करेन -नितेश राणे
"साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा जो क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करेन, त्या दिवशी डिलीट करेन. सगळ्यांचा हिशोब होणार. कारण राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटत नाहीत. एवढं विश्वासाने मी आपल्याला सांगतो", असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नारायण राणेंच्या अटकेच्या प्रकरणात अनिल परब यांच्या नावाचीही त्यावेळी चर्चा झाली होती. एका पत्रकार परिषदेत मोबाईलवरून संवाद करतानाचा त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे नितेश राणेंनी कुणाला इशारा दिला, याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहे.
'हल्ली दाढीवाल्यांचा जमाना, माझाही येईल'
दरम्यान, याच कार्यक्रमात निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. "राणे साहेब म्हणाले दाढी कर जरा. मी म्हणालो हल्ली दाढीवाल्यांचा जमाना आहे. माझाही येईल कधी", असे निलेश राणे म्हणाले.