मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:02 IST2025-07-22T07:02:28+5:302025-07-22T07:02:52+5:30
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
मुंबई : विधान परिषदेत कामकाज सुरू असताना रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. ‘मी रमी खेळत नव्हतो, अचानक जाहिरात पॉपअप झाली’, असे त्यांनी सांगितले असले तरी जे घडले ते भूषणावह नाही, या शब्दात त्यांनी कोकाटेंना सुनावले आहे.
विधिमंडळात जेव्हा चर्चा चालते तेव्हा आपले कामकाज नसले तरीही आपण गांभीर्याने बसणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस तुम्ही कागदपत्रे वाचता; पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हे निश्चितच योग्य नाही, हे अतिशय चुकीचे आहे, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.
कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेणार : तटकरे
साेलापूर : कृषिमंत्री काेकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साेमवारी सांगितले.
मागाल तेवढे पुरावे देतो, विरोधकांचा हल्लाबोल
विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे जंगली रमी खेळत होते त्याचे आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, मागाल तेवढे पुरावे देतो, असे आव्हान शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. आव्हाड यांनी कोकाटेंचे दोन व्हिडिओ एक्सवर पोस्ट करताना म्हटले आहे की, आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा... कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. कोकाटे हे ऑनलाइन जुगाराचे पत्ते बोटाने सरकवत आहेत.