राष्ट्रवादीचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरेश धसांना सूचना दिली होती; काँग्रेसचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:22 IST2025-02-16T15:20:32+5:302025-02-16T15:22:29+5:30
काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे.

राष्ट्रवादीचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरेश धसांना सूचना दिली होती; काँग्रेसचा खळबळजनक आरोप
BJP Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेली राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. डोळ्याचं ऑपरेशन झाल्याने विचारपूस करण्यासाठी मी भेट घेतल्याचं स्पष्टीकरण आमदार धस यांनी दिलं असलं तरी विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अशातच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे.
"बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना सूचना दिल्या होत्या. आका, टिप्पर, रेती असे शब्द आधी आपल्याला ऐकायला मिळत होते. पण आता मांडवली, मांडवली, मांडवली हाच शब्द या प्रकरणात ऐकायला मिळत आहे," असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपाला आता भाजपकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुरेश धसांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं?
"मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या प्रकरणावरून षडयंत्र रचणाऱ्यांचा पर्दाफाश करणार आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालेल. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील," असा इशारा भाजप आमदार सुरेश धस यांनी शनिवारी आष्टीमध्ये दिला. सरपंच हत्या प्रकरणावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपासून धस हल्लाबोल करत आहेत. अशातच धस हे मंत्री मुंडे यांना भेटल्याचे समोर आल्याने वादळ निर्माण झाले. या भेटीवर विरोधकांनी टीकेची उठविल्यानंतर धस यांनी आपली बाजू मांडली.
अजित पवार काय म्हणाले?
"धनंजय मुंडे हे मंत्री आहेत तर सुरेश धस हे आमदार आहेत. त्या दोघांनी भेटणे यात काहीही गैर नाही. ते माणुसकीच्या नात्याने भेटले आहेत," असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. या भेटीसंदर्भात देशमुख कुटुंबीयांच्या भावना योग्य आहेत. कारण त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गेला आहे, असंही त्यांनी नमूद केलं.