मंत्रिमंडळ तर ठरलं, पण खातेवाटप कधी? खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादांनीच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:55 IST2024-12-15T20:52:17+5:302024-12-15T20:55:42+5:30
आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे ते खातेवाटपाकडे. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याकडे. तर मंत्र्यांचे खाते वाटप केव्हा होणार यासंदर्भात खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच माहिती दिली आहे.

मंत्रिमंडळ तर ठरलं, पण खातेवाटप कधी? खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादांनीच सांगितलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडला. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे ते खातेवाटपाकडे. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याकडे. तर मंत्र्यांचे खाते वाटप केव्हा होणार यासंदर्भात खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच माहिती दिली आहे. ते मंत्रीमंडळ विस्तारानंतर, महायुतीच्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
केव्हा होणार खातेवाटप..?
अजित पवार म्हणाले, "आपल्या सर्वांना माहित आहे की कालच्या २३ तारखेला राज्यात प्रचंड बहुमताने युतीचे सरकार आले. यानंतर, आज मंत्रिमंडळाच्या शपथविधीने त्याला खऱ्या अर्थाने अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री महोदय सर्वांचे खातेवाटप करतील आणि कामाला गती आल्याचे हे आपण सर्वांना बघायला मिळेल." तसेच, "आमचा प्रयत्न आहे की, एवढे मोठे बहुमत असल्यामुळे जनतेने महायुतीवर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे करता येईल? हाच प्रयत्न आम्ही सर्व करणार आहोत," असेही अजित पवार म्हणाले.
चहापानावरही केलं भाष्य -
विरोधकांच्या चहापानावरील बहिष्कारासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, "हिवाळी अधिवेशनानिमित्त आज आम्ही सर्वजण नागपुरात आलो आहोत. कॅबिनेट आत्ताच झाली. यावेळी सभागृहात कोणती बिले येणार आहेत, त्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री सांगतीलच. साधारण कामकाज कसे असेल यासंदर्भात. परंतु, अलीकडे एक पायंडाच पडला आहे की, विरोधी पक्ष सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालतो. अलिकडे वर्षानुवर्षे सुरी आहे. त्यामुळे चहापान करावे, करू नये, हा विचार करण्याजोगा प्रश्न निर्माण झाला आहे."