तारपा वाद्य, वारली चित्रकलेने ब्रिटिश भारावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:04 IST2025-06-16T12:02:18+5:302025-06-16T12:04:25+5:30

वारली चित्र, तारपा वाद्य आणि इतर कलात्मक वस्तूंचे भरभरून कौतुक केले.

The British were impressed by the Tarpa musical instrument and Warli painting. | तारपा वाद्य, वारली चित्रकलेने ब्रिटिश भारावले

तारपा वाद्य, वारली चित्रकलेने ब्रिटिश भारावले

पालघर: वारली चित्र, तारपा वाद्य आणि इतर कलात्मक वस्तूंचे भरभरून कौतुक केले तसेच त्याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती घेण्यात मग्न दिसल्या त्या ब्रिटिश महिला. निमित्त होते ते लोककलाकारांच्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी लंडनमध्ये भरलेल्या विशेष प्रदर्शनाचे. लोककला, लोकवाद्ये आणि वारली चित्रशैलीचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोत्साहनपर उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकार रमेश हेंगडी यांनी लंडनमध्ये आपल्या वारली चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. त्याला लंडनवासीयांनी प्रतिसाद दिला.

सांस्कृतिक दौऱ्यात कलेचे कौतुक
कोलकाता, गोवा येथील प्रमुख उत्सवांमध्ये वारली कलाकारांनी कला सादर केल्यानंतर पालघरमधील रमेश हेंगडी यांनी नुकताच लंडनमध्ये ११ दिवसांचा सांस्कृतिक दौरा केला. तिथे त्यांनी आपल्या वारली चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. यावेळी अनेक ब्रिटिश नागरिकांनी हेंगडी यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या कलेचे कौतुक केले. त्याबाबत माहिती जाणून घेतली. 

लोककलांचे जतन  
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने व बांगला नाटक डॉट कॉमच्या पुढाकाराने ऑक्टोबर २०२४ पासून पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये लोककलांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोककलांच्या जतनाबरोबरच स्थानिक पर्यटनाला चालना देण्याचाही पर्यटक विकास महामंडळाचा हेतू होता. 
‘बांगला डॉट कॉम’ने आतापर्यंत ४०० कलाकारांना लोककला, हस्तकला, वारली चित्रकला जगाच्या व्यासपीठावर नेण्यासाठी कार्यशाळा घेतल्या. पालघरमध्ये डहाणू आणि तलासरी तालुका, नाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यात हे उपक्रम राबवतात. यात वारली चित्रकला, बोहाडा मुखवटा , बांबू हस्तकला आणि तारपा, कांबडे, होडी यांसारख्या लोककला, संगीत प्रकारांचे जतन, प्रोत्साहन यांचा समावेश आहे.

Web Title: The British were impressed by the Tarpa musical instrument and Warli painting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.