लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 19:55 IST2025-10-24T19:54:20+5:302025-10-24T19:55:03+5:30
Mumbai Crime News: इतर कुणाशी तरी संबंध असल्याचा संशयावरून झालेलं ब्रेकअप आणि त्यामधून मानसिक तणावाखाली आलेल्या एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याची आणि नंतर चाकूने स्वत:चाही गळा कापून घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी मुंबईतील लालबाग परिसरात घडली होती.

लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव
इतर कुणाशी तरी संबंध असल्याचा संशयावरून झालेलं ब्रेकअप आणि त्यामधून मानसिक तणावाखाली आलेल्या एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याची आणि नंतर चाकूने स्वत:चाही गळा कापून घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी मुंबईतील लालबाग परिसरात घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा सकाळीच मृत्यू झाला होता. तर त्याची प्रेयसी अससेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेरीस संध्याकाळच्या सुमारास तिचीही मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आणि तिचा मृत्यू झाला. तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यामुळे झालेल्या जखमांमधून अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मनिषा यादव असं या मृत तरुणीचं नाव असून, सोनू बराय असं तिच्यावर हल्ला करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आंबेवाडी येथे राहणाऱ्या सोनू बराय (२४) याचे याच परिसरातील पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, आठ ते दहा दिवसांपूर्वी प्रेयसीचे अन्य कोणासोबत संबंध असल्याच्या संशयावरून दोघांचे ब्रेकअप झाले होते. तेव्हापासून सोनू प्रचंड मानसिक तणावात होता आणि तो समेट करण्याचा प्रयत्न करत होता. आज सकाळी सोनूने पीडित तरुणीला भेटायला बोलावले. सुरुवातीला दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. संतापलेल्या सोनूने रस्त्यातच तरुणीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला होता.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरुणी जवळ असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये पळत गेली. सोनूने नर्सिंग होममध्ये घुसून तिच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला केला. नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच, सोनूने चाकूने स्वतःचा गळा चिरून घेतला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना तातडीने केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान सोनू बराय याचा मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या जे.जे. रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तिची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला. आता या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.