ठाकरेंच्या शिवसेनेला कुणापासून धोका? शिंदेंच्या शिलेदारानं थेट नावच घेतलं! केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:29 IST2024-12-06T16:28:10+5:302024-12-06T16:29:37+5:30
"एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते...

ठाकरेंच्या शिवसेनेला कुणापासून धोका? शिंदेंच्या शिलेदारानं थेट नावच घेतलं! केला मोठा दावा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शपथविधी कार्यक्रमात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची, तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासंदर्भात बोलताना "एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. यावर, आता शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी पलटवार करत, "शिंदे यांच्या नेतृत्वात 40 चे 62 आमदार झाले. तसेच, संजय राऊतांपासूनउद्धव ठाकरे गटाला मोठा धोका आहे," असे देसाई यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, काल भाजपचे एकनाथ शिंदे यांना वगळून शपथ घेण्याचे नियोजन होते, कसे बघता? असा प्रश्न विचारला असता शंभूराज देसाई म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी एक भूमिका घेतली, ती संख्या ४० वरून ६२ वर गेली. संजय राऊत काय बोलले, त्यातले खरे ठरले? यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने बघू नका. उलट, संजय राऊतांपासून उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे." देसाई टीव्ही९ सोबत बोलत होते.
उद्धव ठाकरे गटामध्ये आमचे अनेक मित्र... -
देसाई पुढे म्हणाले, "मी मागाशीही बोललो की, उद्धव ठाकरे गटामध्ये आमचे अनेक मित्र आहेत. जरी आमचे राजकीय विचार वेगळे असले, सभागृहामध्ये किंवा सभागृहाबाहेर आम्ही वेगवेगळ्या राजकीय भूमिका जरी मांडत असलो, तरी मित्र म्हणून आमचे बोलणे होते. मित्र म्हणून आम्ही एकत्र बसतो. तेव्हा अनेक तिकडचे उद्धव ठाकरे गटातलेसुद्धा लोक खाजगीत सांगतात की, यांच्या (संजय राऊत) बोलण्यामुळे, यांच्या वागण्यामुळे दुर्दैवाने उद्धव ठाकरे गटावर ही वेळ आलेली आहे." एवढेच नाही, तर "यामुळे, हा सावधानतेचा इशारा आहे, सावधगिरीचा एक इशारा आहे राऊतांना की, त्यांनी आता स्वतःला थोडासा आवर घालावा. नाहीतर राहिल्या साहिल्या उद्धव ठाकरे गटाची काय अवस्था होईल, हे कोणीच सांगू शकणार नाही," असेही देसाई म्हणाले.