मुंबई : उद्धवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रशंसा करताना त्यांचा ‘देवाभाऊ’ असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली. ‘चांगले आहे, धन्यवाद!’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
अलीकडच्या विधिमंडळ अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. तसेच दोघांनी जवळपास २० मिनिटे बंदद्वार चर्चादेखील केली होती. आज उद्धव सेनेच्या मुखपत्रातून फडणवीस यांची स्तुती करण्यात आली.
फडणवीस यांनी १ जानेवारीला वर्षारंभी गडचिरोलीला भेट दिली, एसटीने प्रवास केला, पोलाद जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्याचा निश्चय व्यक्त केला. लोकांशी संवाद साधला होता. ११ जहाल नक्षलवाद्यांनी त्यांच्या उपस्थितीत शस्त्रे खाली ठेवली आणि संविधान हाती घेतले. उद्धवसेनेच्या मुखपत्रात या घटनाक्रमाचा संदर्भ देत फडणवीस यांची प्रशंसा करण्यात आली आहे.
फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे. संभाव्य पालकमंत्री फडणवीस गडचिरोलीमध्ये नवे काहीतरी करतील. तेथील आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करतील, असे एकंदरीत दिसत असल्याचेही मुखपत्रात म्हटले आहे.
उशिरा का होईना कौतुक केले...भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, चांगले आहे, उशिरा का होईना फडणवीस यांचे त्यांनी कौतुक केले. आधीही फडणवीस यांनी राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, तेव्हा कौतुक केले नाही. आता केले, आम्ही त्याचे स्वागत करतो.