ठाकरेंच्या सीएए समर्थनावरून महाविकास आघाडीत खदखद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:44 IST2020-02-23T05:07:59+5:302020-02-23T06:44:20+5:30
कायदा समजून घेण्याचा काँग्रेसने दिला सल्ला

ठाकरेंच्या सीएए समर्थनावरून महाविकास आघाडीत खदखद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केल्यानंतर, त्यास काँग्रेसने तीव्र हरकत घेतली असून, महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष बसून सीएएबाबत जी भूमिका घेतील, ती सगळ्यांना मान्य असेल, असे विधान गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केले आणि एकप्रकारे ठाकरे यांच्या भूमिकेस हरकत घेतली. एनपीआर, एनआरसी आणि सीएए या तिन्ही कायद्यांना काँग्रेसचा विरोध असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सीएएच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत असलेली मतभिन्नता पुन्हा समोर आली.
ठाकरे यांच्या दिल्लीतील विधानावर काँग्रेसने आक्षेप नोंदविला. ‘ठाकरे यांनी जाहीरपणे काही बोलण्यापूर्वी हा कायदा नीट समजून घ्यावा,’ असा सल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी यांनी दिला. तर सीएएचे जाहीर समर्थन ठाकरे यांनी करू नये, असे विधान माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तिवारी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ठाकरे यांनी सीएएबाबत नीट माहिती घेण्याची गरज आहे. २००३च्या कायद्यानुसार एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे. त्यामुळे एकदा एनपीआर लागू केला, तर एनआरसी रोखता येणार नाही. तसेच सीएए कायद्याकडे भारतीय घटनेच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. कारण धर्माच्या आधारे नागरिकत्व दिले जाऊ शकत नाही.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम सकाळीच ट्वीट करून असा चिमटा काढला की, महाराष्ट्रातील आमदारांचे सीएए, एनआरसीवरून अलिकडेच तज्ज्ञांमार्फत प्रबोधन करण्यात आले होते आणि या कायद्यांना विरोध करण्याबाबत त्यांची मानसिकता तयार करण्यात आली होती. मग आज काँग्रेस ज्या पक्षाला सरकारमध्ये पाठिंबा देतेय तो पक्ष या दोन्ही कायद्यांच्या विरोधात आहे, असे निरुपम म्हणाले.
तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील : गृहमंत्री
सीएए, एनआरसी बद्दल शरद पवार यांनी जी भूमिका घेतील तीच आमची सर्वांची भूमिका आहे. महाराष्ट्रात आता तीन पक्षांचे सरकार आहे, त्यामुळे तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य राहील. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एकाचेही नागरिकत्व यामुळे जाणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
भाजपवाले स्वप्न पाहत होते की त्यांचे सरकार येईल पण तसे झाले नाही, मुंगेरीलालसारखे स्वप्न पाहणे त्यांनी सोडले पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला.
उद्धव यांना मी समजून सांगेन - पृथ्वीराज चव्हाण
या वादाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण एका मुलाखतीत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीएएबाबत कोणीतरी समजवावे लागेल. मला संधी मिळाली, तर मी त्यांना हे समजावेन, तर तिन्ही कायद्यांना असलेल्या विरोधाबाबत मित्रपक्ष शिवसेनेला आम्ही आधीही सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पवार यांची नाराजी?
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, खा. संजय राऊत यांच्यात वर्षा निवासस्थानी शनिवारी दुपारी अचानक बैठक झाली.
सीएएबद्दल भूमिका जाहीर करताना मित्रपक्ष म्हणून आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते, या शब्दांत पवार यांनी सदर बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक लवकरच होऊन, तीत सीएएबद्दल चर्चा होणार असल्याचे समजते. अजित पवार यांनी मात्र, ‘लोकमत’शी बोलताना त्याचा स्पष्टपणे इन्कार केला. विधिमंडळ अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक होती आणि ती पूर्वनियोजित होते, असे ते म्हणाले.