Sanjay Raut News:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीतील हरियाणा भवन येथे एक बैठक घेत आहेत. या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण ही बैठक मुस्लीम धर्मातील नेत्यांसोबत होत आहे. या बैठकीला ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासीसह मुस्लीमांचे अनेक धर्मगुरू सहभागी होणार आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरसंघचालक जर मुस्लिम समाजाशी चर्चा करणार असतील, तर या गोष्टीचे आम्ही स्वागत करतो. पण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात जे सातत्याने धर्म आणि समाजाविषयी विष पेरत आहेत, त्यांना विष खाऊन मरायची वेळ येईल. देशात आणि समाजात दुही राहता कामा नये. प्रत्येकाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. ते प्रश्न समजून सरकारसमोर मांडले पाहिजेत. या देशातील नागरिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळायला पाहिजेत. मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो. आज बिहारमध्ये जे सुरू आहे, एका विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांची नावे काढली जात आहे. महाराष्ट्रातही तेच केले. याला लोकशाही म्हणत नाहीत. म्हणून सरसंघचालक अशा प्रकारे काही चर्चा करून काही विषय समोर आणणार असतील, तर आम्ही सरसंघचालकांचे अभिनंदन करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बैठकीला कोण उपस्थित असणार?
ही बैठक संघाच्या मुस्लीम समाजापासून संवाद वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग मानली जाते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय होसाबळे, कृष्ण गोपाळ, रामलाल आणि इंद्रेश कुमारही बैठकीत हजर असणार आहेत. याआधी सप्टेंबर २०२२ मध्येही मोहन भागवत यांनी मुस्लीम समाजातील लोकांसोबत चर्चा केली होती.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या स्थापनेचा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. ज्या अंतर्गत ते भारतातील प्रत्येक गावात, शहरात, घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. शताब्दी वर्षात देशातील प्रत्येक भागात आपली विचारधारा आणि सेवा कार्य पसरवण्याचा प्रयत्न संघ करत आहे. ही बैठक याच दृष्टीने महत्त्वाची मानली जाते जिथे विविध धर्मातील लोकांसोबत सुसंवाद साधण्याचा, सहकार्य करण्याचा भाग आहे.