माझी हात जोडून विनंती आहे की...; संजय राऊतांचा अण्णा हजारेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 11:35 AM2023-07-23T11:35:00+5:302023-07-23T11:35:54+5:30

अण्णा हजारेंना जाग आलीय ही मोठी गोष्ट आहे असं संजय राऊतांनी म्हटलं.

Thackeray group MP Sanjay Raut criticizes BJP and Anna Hazare | माझी हात जोडून विनंती आहे की...; संजय राऊतांचा अण्णा हजारेंना खोचक टोला

माझी हात जोडून विनंती आहे की...; संजय राऊतांचा अण्णा हजारेंना खोचक टोला

googlenewsNext

मुंबई – गेल्या काही वर्षापासून अण्णा हजारे काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. अण्णाने थेट मणिपूर घटनेवर बोलले, मणिपूरसोबत अन्यही विषय आहेत. भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते म्हणून अण्णा हजारेंची ओळख आहे. पण महाराष्ट्रात काय चाललंय? भाजपाने पुराव्यासह ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे शपथ घेऊन भाजपा सरकारमध्ये मंत्री झालेत. अण्णा हजारेंनी यावर आवाज उठवायला हवा. अजित पवार, हसन मुश्रीफ असतील किंवा इतर यांच्यावर भ्रष्टाचाराचे शेकडो रुपयांचा गंभीर आरोप आहे. अण्णा हजारेंनी या विषयावर भूमिका घेऊन एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, मणिपूर या विषयावर अख्खा देश रस्त्यावर आहेत. सगळे त्यावर बोलत आहेत. मधल्या काळात अनेक विषय झाले, महिला कुस्ती पटूबाबत विषय आहे ज्यात थेट भाजपाचा संबंध आहे. आम्ही वाट बघत होतो अण्णा हजारे त्यावर बोलतील, भूमिका घेतील. राज्यात सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी मंत्रिमंडळात आहेत. भ्रष्टाचाऱ्यांचा सत्कार पंतप्रधान दिल्लीत करतायेत. महाराष्ट्रात अण्णा हजारेंची ओळख आहे. अण्णा हजारेंची प्रतिमा आहे. दादा भुसे, राहुल कुल, अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रकरणे मी बाहेर काढली. ते अण्णांच्या डोळ्यासमोर आहे. अण्णा हजारे यांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही नेहमी देश वाचवण्यासाठी भूमिका घेतली आहे. रामलीला, जंतरमंतर याठिकाणी अण्णा हजारेंनी आंदोलन केले. अण्णांच्या आंदोलनामुळे आज भाजपा सत्तेत आहे आणि काँग्रेस सत्तेतून गेली. आज त्याच भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी रणशिंग फुंकण्याची गरज आहे असं राऊतांनी म्हटलं.

तसेच अण्णा हजारेंना जाग आलीय ही मोठी गोष्ट आहे. देशात भ्रष्टाचार वाढलाय, बलात्कार वाढलेत आम्ही अण्णा हजारेंना म्हटलं अण्णा उठा, रामलीला मैदान, जंतरमंतरला जाऊया. तेव्हा अण्णा कुठे होते? जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू आंदोलन करत होते तेव्हा अण्णा कुठे होते? मणिपूर हिंसाचारावर आज देश बोलतोय. त्यात अण्णा हजारे बोलले त्यात नवीन काय असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.  

हे धोरण अतिशय घोतक

देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंगचा नारा दिला आज सगळेच भ्रष्टाचारी भाजपात गेले आणि शुद्ध झाले. स्वत:चा जीव वाचवायला अनेक जण भाजपात गेले. काही दिवसांनी सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. सत्तेत नाही असे जे आमदार आहेत ते लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही का? मतदारसंघाचा विकास करण्याचा अधिकार नाही का? पण या देशात जो आमच्यासोबत येईल मग तो भ्रष्टाचारी असेल, व्यभिचारी असेल त्यांनाच विकासकामांसाठी निधी दिला जाईल. हे धोरण अतिशय घातक आहेत असा आरोपही राऊतांनी केला.

मुख्यमंत्रिपदाचे आसन अस्थिर

दरम्यान, अजित पवार आल्यापासून मुख्यमंत्रिपदाचे आसन अस्थिर झालेले आहे. एक मोदी सबपर भारी अशी घोषणा आहे मग त्यांना ३८-४० कशाला लागतायेत. एनडीएला काय करायचे ते करू द्या. पण इंडिया ही २०२४ च्या निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी स्थापन झाली आहे. कालपर्यंत मोदींना एनडीए आठवला नाही का? असा सवाल संजय राऊतांनी केला.    

 

Web Title: Thackeray group MP Sanjay Raut criticizes BJP and Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.