“तहव्वूर राणाला अमेरिकेने देऊन टाकले, हिंमत असेल तर दाऊदला आणा”; संजय राऊतांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:56 IST2025-04-10T18:56:06+5:302025-04-10T18:56:35+5:30
Sanjay Raut On Tahawwur Rana Extradition To India: बिहार निवडणुका होईपर्यंत तहव्वूर राणा फेस्टिव्हल सुरू राहील. राणाला आणण्यात यांचे कर्तृत्व काय? एवढीच हिंमत असेल तर पाकिस्तानात घुसून कुलभूषण जाधवांना परत घेऊन या, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

“तहव्वूर राणाला अमेरिकेने देऊन टाकले, हिंमत असेल तर दाऊदला आणा”; संजय राऊतांचे आव्हान
Sanjay Raut On Tahawwur Rana Extradition To India: तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी काँग्रेसच्या कार्यकाळापासून प्रयत्न सुरू होते. याबाबत यांना माहिती नसेल. तेव्हापासून न्यायालयीन लढाई सुरू होती. त्यानंतर आता १६ वर्षांनी हे प्रत्यार्पण झाले आहे. या हल्ल्याच्या मागे पाकिस्तानचा होता हे सगळ्यांना माहिती आहे, यात नवीन गोष्ट कोणती आहे. पुलवामा हल्ल्याबाबत यांनी सखोल चौकशी करायला हवी होती. तहव्वूर राणाला आणाल, तसेच काँग्रेसच्या कार्यकाळात अबू सालेमला आणले होते. राणाला भारतात आणले यात विशेष असे काहीच नाही. परंतु, यांना याचा फेस्टिव्हल करायचा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, जर तुमच्यात एवढीच हिंमत आहे, तर नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, पाकिस्तानच्या जेलमध्ये कुलभूषण जाधव सडत आहे, त्यांना सोडवून आणा आणि त्यानंतरच राणाला भारतात आणल्याबाबत उत्सव साजरे करा. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
तहव्वूर राणाला अमेरिकेने देऊन टाकले, हिंमत असेल तर दाऊदला आणा
आमचे सरकार येईल, तेव्हा पाकिस्तानात जाऊन कारवाई करू, असे सांगत होते. परंतु, आतापर्यंत असे घुसून कोणावर कारवाई केली, याची माहिती द्यावी. हिंमत असेल तर आधी दाऊदला आणा, राणाला तर अमेरिकेने देऊन टाकले आहे. त्यात तुमची मर्दानगी काही नाही. न्यायालयीन लढाई लढली गेली, जी काँग्रेस काळापासून सुरू होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बिहार निवडणुका होईपर्यंत तहव्वूर राणा फेस्टिव्हल सुरू राहील. राणाला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची बाजी लावून कसाबला पकडले होते. कसाबला फाशी झाली. राणालाही नक्की फाशीची शिक्षा होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले गेले आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली. अखेरीस तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले. आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.