Thackeray Group MP Sanjay Raut News: जगातील सर्वांत मोठ्या स्वरुपाचा धार्मिक सोहळा असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला. या दिवशी सुमारे १.४४ कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. तर १३ जानेवारी २०२५ पासून ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ६६.२१ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. या महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध पक्षांचे राजकीय नेते, दिग्गज मंडळी, सेलिब्रिटींनी आवर्जून सहभागी होत गंगास्नान केले. उद्धव ठाकरे महाकुंभमेळ्यात सहभागी झाले नाहीत, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. दावे-प्रतिदावेही करण्यात आले. यातच आता ठाकरे गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या महाकुंभातील सहभागावरून सवाल उपस्थित केला आहे.
बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण टाकण्याचे काम त्यांनी केले होते. ते पाप धुण्यासाठी मी कुंभमेळ्याला गेलो होतो. हे लोक पाप लपविण्यासाठी लंडनमध्ये जातात, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, मोहन भागवत आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो शेअर केले आहेत.
मोहन भागवत महाकुंभात का गेले नाही, हे विचारायची हिंमत शिंदेंनी दाखवावी
संजय राऊत आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, एकनाथ शिंदे यांची कमाल आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाकुंभमेळ्यात का गेले नाहीत, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला होता. व्हेरी गुड, एकनाथ शिंदे यांनी हाच प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS प्रमुख मोहन भागवत यांना विचारण्याची हिंमत दाखवायला हवी. भाजपाचा बॉस हिंदू नाही का, अशी विचारणा करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिले आहे.
नेमके काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
पूर्वी नमस्कार करताना रामराम करायचो, त्याचे श्रीराम कधीपासून म्हणायला लागलो, याचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राशी गद्दारी करून काही जणांनी गंगेत डुबक्या मारल्या. त्यांनी कितीही डुबक्या मारल्या तरी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यांनी जे पाप केले आहे ते धुतले जाणार नाही. मला आता गंगेचे पाणी देण्यात आले. मला मान आहे. सन्मान आहे. इकडे ५० खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली याला काही अर्थ नाही. गंगेत जाऊन कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा डाग तसाच राहणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान, ज्याचा सनातन धर्मावर विश्वास आहे, ज्याला हिंदू जीवन पद्धती प्रिय आहे, असे सगळे लोक महाकुंभमेळ्यात गेले. काही लोक नाही, गेले त्याची वेगळी कारणे असू शकतात. कुणी गेले नाही म्हणजे त्यांचे सनातन धर्मावर प्रेम नाही, असे मी म्हणणार नाही. त्यांची आपली काही कारणे असतील. जे गेले त्यांचे प्रेम आहे, असे समजूया. केवळ दाखवण्यासाठी गेले नाही, असेही आपण समजूया. उद्धव ठाकरे अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरे काय बोलतात, त्याला रोज उत्तरे द्यायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली होती.