नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:50 IST2025-05-02T12:48:37+5:302025-05-02T12:50:15+5:30

Shiv Sena Shinde Group News: या सर्वांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

thackeray group faces setback in navi mumbai former corporators left the uddhav sena party and join shiv sena shinde group | नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

Shiv Sena Shinde Group News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून, शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेत आहे. यामुळे शिंदेसेनेची ताकद वाढत असल्याचे सांगितले जात आहे. 

राज्यभरातून ठाकरे गटाला खिंडार पडत असल्याचे दिसत आहे. नवी मुंबईतील उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी एक्सवर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली. नवी मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे तसेच त्यांच्या पत्नी सुनीता रतन मांडवे यांनी ठाण्यातील आनंदआश्रम येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. 

भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

बेलापूर विधानसभा अधिकारी निखिल मांडवे, शाखाप्रमुख अनुभव बेळे, शाखा संघटक जयश्री बेळे, विधानसभा संघटक सुनील सानप, विभाग अधिकारी विशाल गुंजाळ, शाखा अधिकारी अमित जाधव यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे एकनाथ शिंदे यांनी एक्सवर म्हटले आहे. तसेच तसेच राष्ट्रीय काँग्रेस प्रणित कामगार संघटना असलेल्या इंटकच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित भटनागर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रभाताई कांबळे तसेच पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि मुंबईतील विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. 

दरम्यान, या सर्वांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत. विधानसभा निवडणुकीने खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न कायमचा निकाली काढल्याने आता पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेकडे आकृष्ट होत असून त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकांवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

Web Title: thackeray group faces setback in navi mumbai former corporators left the uddhav sena party and join shiv sena shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.