ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 11:18 IST2025-07-19T11:17:13+5:302025-07-19T11:18:24+5:30

मराठीचा मुद्दा घेऊन सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकता नाही. याच सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. काँग्रेसने दिला नाही असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.

Thackeray brand is not working in the market, people do not like it; BJP Sudhir Mungantiwar Target Raj Thackeray and Uddhav Thackeray | ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला

ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला

नागपूर - ठाकरे ब्रँड जिवंत असला तरी तो बाजारात चालत नाही. बाजारात अनेक ब्रँड असतात, प्रत्येक ब्रँड बाजारात चालतो असे नाही. सध्या हा ब्रँड बाजारात जनतेस पसंत नाही. मतदारांना आवडत नाही अशा शब्दात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधू राज आणि उद्धव यांच्यावर निशाणा साधला. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे स्वत:ला सामान्य समजत असतील, कारण ते चिंताग्रस्त झालेत. बाकी सर्वसामान्य जनता जे मतदार आहेत ते आमच्यासोबत आहे. मतदानातून ईव्हीएम बटण दाबून त्यांनी त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे हे सांगितले आहे. राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय की जादूटोणा वैगेरे भाषा केली जाते. जादूटोणा करून इतक्या जागा मिळाल्या असत्या तर आपल्या देशातील गरिबी हटवता आली असती, देशातला जातीयवाद हटवता आला असता. जादूटोणा जगात नाही. जादूटोणा असता तर आपल्याला गुलामगिरीत राहावे लागले नसते. ती कपोलकल्पित कथा आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मराठीचा मुद्दा घेऊन सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकता नाही. याच सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. काँग्रेसने दिला नाही. १९५६ मध्ये कर्नाटक सीमेत मराठी भाषिकांना बळजबरीने घालण्याचं काम काँग्रेसने केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजवण्याचा प्रयत्न झाला. कारवार, निपाणी कर्नाटकला देऊ नका मात्र नेहरूंनी ऐकले नाही. कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर तिथली भाषा संपवावी म्हणून प्रयत्न करतायेत. उदय सामंत मराठी भाषा विभागाचे मंत्री आहेत तिथे भाषेच्या संवर्धनासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल असं त्यांनी सांगितले. त्याचा अर्थ मराठी भाषा, मराठी भाषिक यांच्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. राज ठाकरे यांच्या सूचनांचे स्वागत आहे. या राज्यात कुणीही असो त्याने हृदयात मराठीचे प्रेम ठेवूनच पुढे जायचे आहे असं मुनगंटीवारांनी राज यांच्यावर भाष्य केले. 

दरम्यान, महाराष्ट्रात मराठी सक्तीची आहेच. शिक्षण समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रीवर निर्णय होईल. राज ठाकरे यांनी काय भाषा वापरायची हा त्यांच्या पक्षाच्या संस्काराचा भाग आहे. जसे संस्कार तसे उच्चार असतात असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना लगावला. 

Web Title: Thackeray brand is not working in the market, people do not like it; BJP Sudhir Mungantiwar Target Raj Thackeray and Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.