पाकसोबतच्या क्रिकेटवरून ठाकरे-भाजपमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 07:31 IST2025-08-24T07:30:00+5:302025-08-24T07:31:44+5:30
Uddhav Thackeray News: माझ्या कणाकणात गरम सिंदूर वाहतेय, असे आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणत असतात. मग, आता पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळण्याची परवानगी देताना ते कुठे गेले? गरम सिंदूरचे कोल्डड्रिंक झाले काय?, असा सवाल करत उद्धव सेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी आशिया चषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळण्यास तीव्र विरोध दर्शविला.

पाकसोबतच्या क्रिकेटवरून ठाकरे-भाजपमध्ये जुंपली
मुंबई - माझ्या कणाकणात गरम सिंदूर वाहतेय, असे आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणत असतात. मग, आता पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळण्याची परवानगी देताना ते कुठे गेले? गरम सिंदूरचे कोल्डड्रिंक झाले काय?, असा सवाल करत उद्धव सेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी आशिया चषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळण्यास तीव्र विरोध दर्शविला. या टीकेला भाजप नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने दोघांत चांगलीच जुंपली.
शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ठाकरे म्हणाले की, कबुतरांसाठी, कुत्र्यांसाठी आणि हत्तिणीसाठी अक्षरश: हजारो लोक रस्त्यावर उतरतात. त्यातून भूतदया, माणुसकीची झलक दिसते. पहलगाममध्ये आपले नागरिक मारले गेले. जवान शहीद झाले. माता भगिनींचे सिंदूर पुसले. तरी पाकविरुद्ध क्रिकेट खेळण्याची भूमिका घेतली जाते, तेव्हा देशाच्या अस्मितेचा विचार का केला जात नाही?
एकीकडे दहशतवादी देश म्हणून पाकविरुद्ध भूमिका घ्यायची व दुसरीकडे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचे ही विसंगती आहे. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, विनायक राऊत व आमदार महेश सावंत उपस्थित होते.
सरकारी आदेशाची होळी करू
शिक्षकांना शिक्षकेतर काम दिले जात असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना गहू-तांदूळ निवडण्याचे काम दिले जाते. नको ती कामे दिली जातात. पण, उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला नको ती कामे सांगितली, तर त्याचे आदेश घेऊन या आपण त्या आदेशाची होळी करून टाकू, कारण आपण वेडेवाकडे काम करणार नाही. आपण गुरुदेव म्हणतो, पण शिक्षक त्यांच्या घरातील गुरं नाहीत, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.
शेलार यांचे प्रत्युत्तर
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
यासंदर्भात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, की राऊत हे ट्रम्पना देखील पत्र पाठवू शकतात. मुळात फक्त पाकिस्तान विरुद्ध सामने खेळणार नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका कायम आहे. मात्र, आशिया चषक ही बहुदेशीय स्पर्धा आहे आणि त्यात खेळू नये, ही भूमिका
भारत, भारतीय खेळाडू आणि क्रिकेटचे चाहते यांच्यासाठी जाचक आहे.