औषधांची प्रयोगशाळेत तपासणी करा, मगच वापरा; आरोग्यमंत्री आबिटकरांच्या प्रशासनाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:28 IST2025-02-09T06:27:58+5:302025-02-09T06:28:22+5:30
राज्यात २०२४-२५ मध्ये ९,६०० प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली. त्यातील ४,६९१ पैकी ३,१७९ नमुने वापरण्यास योग्य, तर ५ नमुने वापरण्यास अयोग्य आहेत

औषधांची प्रयोगशाळेत तपासणी करा, मगच वापरा; आरोग्यमंत्री आबिटकरांच्या प्रशासनाला सूचना
मुंबई : काही महिन्यांपूर्वी पुरवठादारांनी रुग्णालयांना बनावट औषधे पुरवल्याचे आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुरवठादारांकडून औषधे खरेदी केल्यांनतर त्यांची प्रयोगशाळेत चाचणी करावी आणि ती बनावट नसल्याचा अहवाल आल्यानंतर वापरात आणावी, अशा सूचना आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत हे आबिटकर यांनी हे दिले. सर्व शासकीय रुग्णालयांनी औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, औषध गुणवत्ता तपासणी मोहीम नवीन नियमावलीनुसार राबवावी, सर्व आरोग्य संस्थांनी खरेदी केल्यानुसार औषधाच्या नोंदी ई-औषधी प्रणालीमध्ये २४ ते ४८ तासांच्या आत घ्याव्यात, खरेदी केलेल्या सर्व औषधांचे बॅचनिहाय नमुने एनएबीएल प्रयोगशाळेत तपासणीस पाठवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
४,६९१ पैकी ५ नमुने वापरण्यास अयोग्य
राज्यात २०२४-२५ मध्ये ९,६०० प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली. त्यातील ४,६९१ पैकी ३,१७९ नमुने वापरण्यास योग्य, तर ५ नमुने वापरण्यास अयोग्य आहेत. १,५०७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवालानुसार वापरण्यास अयोग्य बॅचेसची माहिती सर्व संबंधितांना दिली आहे. त्यांचा वापर थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.