कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 23:59 IST2025-11-14T23:58:43+5:302025-11-14T23:59:21+5:30
धडक इतकी भीषण होती की, कारने तत्काळ पेट घेतला आणि या आगीत कार चालकासह संपूर्ण कार जळून खाक झाली.

कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
नगर-मनमाड महामार्गावर कोपरगावजवळ भास्कर वस्ती परिसरात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लक्झरी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जबरदस्त होता की, धडकेनंतर कारला लागलेल्या आगीत कारचा चालक जागीच जळून ठार झाला. या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नेमकी घटना काय घडली?
कोपरगाव येथून येवलाच्या दिशेने जाणारी एमएच ०१ क्यूसी ३५१६ क्रमांकाची लक्झरी बस भास्कर वस्तीजवळ आली. त्याचवेळी, येवलाकडून कोपरगावकडे येणाऱ्या एका कारची आणि या बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारने तत्काळ पेट घेतला आणि या आगीत कार चालकासह संपूर्ण कार जळून खाक झाली. अपघातात मृत्युमुखी पडलेला कार चालक हा विंचूर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
बचावकार्यासाठी नागरिकांची धावपळ
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. कोपरगाव नगर पालिका आणि येवला नगर पालिका अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले.
अपघातामुळे नगर-मनमाड महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली.