इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या आणि त्यांच्याशी वाद घालताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. प्रशांत कोरटकर याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करताना कोल्हापूरमधीलन्यायालयाने त्याला ११ मार्चपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत यांनी केलेल्या मतप्रदर्शनानंतर प्रशांत कोरटकर याने आपल्याला फोनवरून धमकावल्याचा तसेच वाद घालताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्यव्य केल्याचा दावा इंद्रजित सावंत यांनी केला होता. मात्र आपला आवाज मॉर्फ करण्यात आल्याचा दावा करत प्रशांत कोरटकर यांने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.
इंद्रजित सावंत यांनी केलेल्या आरोपांनंतर प्रशांत कोरटकर याच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. तसेच त्याच्याविरोधात कोल्हापूर आणि नागपूरमध्ये गुन्हे दाखल झाले होते. त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल झालं होतं. मात्र तत्पूर्वीच कोरटकर हा फरार झाला होता.
दरम्यान, प्रशांत कोरटकर याने कोल्हापूरमधील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने त्याला दिलासा दिला आहे. तसेच ११ मार्चपर्यंत त्याला अटक करू नये, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ११ मार्च रोजी न्यायालयामध्ये पुढील सुनावणी होणार आहे. तसेच कोल्हापूर पोलिसांनीही या प्रकरणी आपलं उत्तर दाखल करावं, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.