तासगाव ‘बिनविरोध’ नाहीच

By Admin | Updated: March 28, 2015 00:05 IST2015-03-27T22:27:18+5:302015-03-28T00:05:51+5:30

नऊजण रिंगणात : सुमनताई पाटील यांना भाजप बंडखोराचे आव्हान

Tasgaon is not 'uncontestable' | तासगाव ‘बिनविरोध’ नाहीच

तासगाव ‘बिनविरोध’ नाहीच

सांगली : राज्याचे लक्ष लागलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. राष्ट्रवादीच्या उमेदवार, दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याविरोधात आठ अपक्ष रिंगणात असल्याचे शुक्रवारी(दि. २७) अर्ज माघारीच्या अखेरच्या मुदतीनंतर स्पष्ट झाले. अपक्षांमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार स्वप्निल पाटील यांचा समावेश असून, त्यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे पाठबळ असल्याचे सांगितले जाते.आर. आर. पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने सुमनताई पाटील यांची उमेदवारी जाहीर करून सर्व पक्षांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, पतंगराव कदम यांनी त्यासाठी प्रयत्न केले. या आवाहनाला प्रतिसाद देत काँग्रेस, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, शेकापसह भाजपनेही तासगाव-कवठेमहांकाळमधून उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत
(दि. २४) सुमनताई यांच्यासह १९ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात अपक्षांचाच भरणा होता. त्यामुळे राष्ट्रवादीने सर्व अपक्षांची मनधरणी सुरू केली होती. राष्ट्रवादीकडून डमी अर्ज भरणाऱ्यांनी माघार घेतल्याने कालअखेर १६ अर्ज राहिले होते.

राष्ट्रवादीची सूत्रे बाजार समितीतून
तासगावच्या बाजार समिती परिसरातील दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कार्यालयातूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसची सूत्रे हलविली जात होती. सकाळपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात गर्दी केली होती.
दुपारी दोननंतर आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर हालचालींना गती आली.

Web Title: Tasgaon is not 'uncontestable'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.