खेकड्यांनी मंत्रीपदच पोखरलं ! तानाजी सावंतांना शिवसेनेने डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 01:01 PM2019-12-31T13:01:40+5:302019-12-31T13:02:26+5:30

सावंत यांच्यावर शिवसेनेने निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी टाकली होती. अनेक उमेदवाऱ्या त्यांनी निश्चित केल्या होत्या.

Tanaji Savant ignored by shivsena | खेकड्यांनी मंत्रीपदच पोखरलं ! तानाजी सावंतांना शिवसेनेने डावलले

खेकड्यांनी मंत्रीपदच पोखरलं ! तानाजी सावंतांना शिवसेनेने डावलले

googlenewsNext

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असलेले तानाजी सावंत यांना पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेकडून डावलण्यात आले आहे. सावंत यांचा युती सरकारमधील मंत्रीपदाचा कार्यकाळ काहीचा वादग्रस्त राहिल्यामुळे त्यांची मंत्रीपदाची संधी हुकली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तिवरे धरण फुटले होते. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटल्याची अजब प्रतिक्रिया सावंत यांनी त्यावेळी दिली होती. या वक्तव्यामुळे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. तसेच खेकड्यांनी धरण फोडले तर मग गुन्हा कोणावर दाखल करायचा असा संताप अनेकांनी व्यक्त केला होता. या वक्तव्यामुळे सावंत यांच्या प्रतिमेला धक्का लागला होता. या व्यतिरिक्त महाराष्ट्राला भिकेला लावेल, असं वक्तव्यही सावंत यांनी केलं होतं. त्यावर विरोधकांनी मोठी टीका केली होती. 

दुसरीकडे सावंत यांच्यावर शिवसेनेने निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी टाकली होती. अनेक उमेदवाऱ्या त्यांनी निश्चित केल्या होत्या. तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापण्यासाठी सावंत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी देखील मिळवून दिली. मात्र रश्मी बागल यांच्यापेक्षा 20 हजार अधिक मते पाटील यांना मिळाले. त्यामुळे शिवसेनेचे एका जागेचे नुकसान झाले हे स्पष्ट होते. किंबहुना यामुळे शिवसेनेने सावंत यांना मंत्रीपदापासून दूर केले, की खेकड्यांच्या वक्तव्यामुळे डावलले याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही. 
 

Web Title: Tanaji Savant ignored by shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.