तमाशापंढरी गजबजली
By Admin | Updated: March 21, 2015 23:07 IST2015-03-21T23:07:33+5:302015-03-21T23:07:33+5:30
गुढी पाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी राज्यातून आलेले गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्यामुळे तमाशापंढरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

तमाशापंढरी गजबजली
नारायणगाव : लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कलापंढरीत गुढी पाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी राज्यातून आलेले गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्यामुळे तमाशापंढरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे तमाशा बुकिंगवर परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र, दिवसभरात २०० हून अधिक सुपाऱ्या तमाशा खेळाच्या गेल्या आहेत. जवळपास अडीच कोटी रुपयांची उलाढाल आज तमाशापंढरीत झाली़, अशी माहिती लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी दिली़.
लोकनाट्य तमाशा फडमालकांच्या दृष्टीने गुढी पाडवा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुढी पाडव्याचे औचित्य साधून नारायणगाव येथील तमाशापंढरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच नगर, नाशिक, ठाणे या भागातील ग्रामस्थ आल्याने या ठिकाणी जणू जत्राच भरते.
आपल्या गावातील यात्रेनिमित्त तमाशाची सुपारी देण्यासाठी गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ येथील २९ राहुट्यांमध्ये आले होते. तमाशा ठरविताना तमाशात कलाकार किती, महिला कलावंत किती, वग कोणता, गाणी किती होणार यांची प्रामुख्याने विचारणा गावपुढाऱ्यांकडून होत होती. कालाष्टमी व पौर्णिमा या दिवसांसाठी तमाशा खेळाला जास्त मागणी होती़
यंदा बैलगाडा शर्यतींवर बंदी असल्याने यात्रातील रंगत कमी झाली असली तरी त्यामुळे तमाशाच्या खेळाला महत्व वाढले आहे. नारायणगावातील गर्दी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.(वार्ताहर)
४गुढी पाडव्यानंतर ग्रामीण भागात यात्रांच्या हंगामाला सुरूवात होते. यात्रा म्हटली की तमाशा आलाच. तमाशा ठरविण्यासाठी गावोगावचे पुढारी गाववर्णनी काढतात. त्यानंतर नारायणगावातून येऊन तमाशाची सुपारी दिली जाते. ज्याची सुपारी मोठी त्या गावची यात्रा मोठी असे समजले जाते.
४गावच्या लोकवर्गणीतून कुस्त्यांचा आखाडाही भरवला जातो. त्यामध्ये जिल्हाभरातून नामवंत पैलवान हजेरी लावतात. यंदा बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने केवळ हेच मनोरंजनाचे साधन आहे.
४प्रत्येक फडमालकाला दिवसभरात ७ ते १० सुपाऱ्या मिळाल्या. या वर्षी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे तमाशा बुकिंगला फटका बसेल, असे वाटत असताना प्रत्यक्षात सर्वच फडमालकांना हे वर्ष चांगले गेले़ तमाशा फडमालकांच्या दृष्टीने पौर्णिमा, कालाष्टमी या दिवसांना विशेष महत्त्व असून, या तारखांना लोकनाट्य तमाशा खेळाची सुपारी सर्वाधिक किमतीची मिळते़
४या वर्षी सर्वाधिक सुपारी मिळाली ती भिका- भीमा यांना. त्यांची कालाष्टमी ३ लाख २५ हजार, तर पौर्णिमा १ लाख ९१ हजारांना गेली. रघुवीर खेडकर यांची कालाष्टमी ३ लाखांना आणि पौर्णिमा २ लाख २५ हजार रुपयांना गेली. तर, त्याखालोखाल कुंदा पाटील, मालती इनामदार, अंजली नाशिककर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, जगनकुमार वेळवंडकर, विनायक महाडिक, आनंद लोकनाट्य जळगावकर, हरिभाऊ बढे नगरकर, काळू-बाळू, दत्ता महाडिक पुणेकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, संध्या माने सोलापूरकर, रवींद्र खोमणे औरंगाबादकर, जगनकुमार वेळवंडकर, लता पुणेकर यांच्या सुपाऱ्या गेल्या अशी माहिती नारायणगाव लोकनाट्य तमाशा कलापंढरीचे अध्यक्ष गणपतदादा कोकणे व उपाध्यक्ष अन्वरभाई पटेल यांनी दिली़.
सव्वातीन
लाखांची सुपारी
४या वर्षी सर्वाधिक सुपारी मिळाली ती भिका-भीमा यांना. त्यांची कालाष्टमी ३ लाख २५ हजार, तर पौर्णिमा १ लाख ९१ हजारांना गेली.
४तमाशापंढरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच नगर, नाशिक, ठाणे या भागातील ग्रामस्थ आल्याने या ठिकाणी जणू जत्राच भरते.
नारायणगाव येथे तमाशा फडाच्या २९ राहुट्या आहेत़ एका राहुटीत साधारणपणे १० ते १५ सुपाऱ्या बुक झालेल्या आहेत़ मोठ्या फडाच्या सुपाऱ्या जवळजवळ बुक झालेल्या आहेत़ सरासरी सर्व फडांचे ६० ते ७० टक्के बुकिंग झालेले आहे़ मध्यम व छोट्या फडांनादेखील या वर्षी चांगली मागणी आहे.
- संभाजीराजे जाधव, अध्यक्ष
लोकनाट्य मराठी तमाशा परिषद