राजू शेट्टींशी चर्चा करूनच माझ्या मुलाला उमेदवारी - सदाभाऊ खोत
By Admin | Updated: February 14, 2017 18:38 IST2017-02-14T18:38:24+5:302017-02-14T18:38:24+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी काय टीका केली, हे मला माहीत नाही. ते माझ्या संघटनेचे

राजू शेट्टींशी चर्चा करूनच माझ्या मुलाला उमेदवारी - सदाभाऊ खोत
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 14 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी काय टीका केली, हे मला माहीत नाही. ते माझ्या संघटनेचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्याविरोधात मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिली. माझा मुलगा सागर याची बागणी (ता. वाळवा) गटातील उमेदवारी खा. शेट्टी यांच्याशी चर्चा करूनच रयत विकास आघाडीच्या नेत्यांनी निश्चित केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खा. शेट्टी यांनी सोमवारी सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध करत आपण तेथे प्रचाराला जाणार नसल्याचे सांगितले होते. खोत यांची घराणेशाही मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याबाबत खोत यांना विचारले असता ते म्हणाले की, वाळवा तालुक्यातील प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी बहुतांशी पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन रयत विकास आघाडी केली आहे. त्यावेळी निवडून येण्याची शक्यता असलेल्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय आघाडीच्या सर्व नेत्यांनी घेतला होता. आघाडीचे नेते आमदार शिवाजीराव नाईक, वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, नानासाहेब महाडिक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बागणी परिसराचा दौरा करून सागरची उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वी खा. शेट्टी यांच्याशी आघाडीच्या नेत्यांनी सागरच्या उमेदवारीबद्दल चर्चा केली होती. तरीही त्यांनी नाराजी का व्यक्त केली, असा प्रश्न मला पडला आहे.
ते म्हणाले की, सागरची उमेदवारी ठरविण्याच्या प्रक्रियेत मी कोठेही नव्हतो. मला माझ्या मुलापेक्षाही कार्यकर्ते पहिल्यापासून जवळचे वाटत आले आहेत. माझ्या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. माझा जन्म कष्टकऱ्यांच्या चळवळीत झाला असल्यामुळे, राजकारणापेक्षाही संघटना आणि चळवळ माझ्यादृष्टीने महत्त्वाची आहे. मी काम करीत असताना चळवळीच्या माध्यमातून काही पदे मिळाली, तर घ्यायचीच नाहीत का? चळवळीमुळे काही गावांमध्ये संघटना मजबूत झाली असेल, तर तेथे उमेदवार उभे करायला नकोत का? मुलांना राजकारणापासून दूर राहा, असे सांगायचे का? माझा मुलगा निवडणुकीसाठी उभा राहिला, यात माझी काय चूक? खासदार शेट्टी आमचे नेते आहेत. ते राजकारणातील ज्येष्ठ असल्यामुळे मी त्यांच्याविरोधात काही बोलणार नाही. सागरच्या उमेदवारीमुळे काही गैरसमज झाले असतील, तर त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करून ते दूर करण्यात येतील, असेही खोत यांनी स्पष्ट केले.
भाजपसह मित्रपक्षांचा प्रचार करणार
सत्ता की संघटना, यापैकी नेमकी कोणती निवड करायची, हा प्रश्न सध्यातरी माझ्यासमोर नाही. माझ्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे, ती आधी पूर्ण करणार आहे. भाजप सरकारचे काम चांगले
चालू असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. भाजपसह अन्य मित्रपक्षांच्या प्रचारालाही मी जाणार आहे. यासाठी मला काहीही अडचण नाही. भाजपचे नेते संघटनेच्या कार्यकर्त्यांना फूस लावतात, हा अनुभव मला तरी अजून आलेला नाही, असे स्पष्टीकरणही सदाभाऊ खोत यांनी दिले.
माझा मुलगा पंढरीचा वारकरी!
सागर हा शेतकरी व कष्टकरी चळवळीत काम करून पुढे आला आहे. तो पंढरीचा वारकरी असून त्याचा ग्रामीण जनतेशी चांगला संबंध आहे. येथे केवळ माझा मुलगा म्हणून जर त्याच्यावर शिक्का मारला गेला, तर त्याच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. सागरच नव्हे, तर संघटनेतील कार्यकर्ताही त्याच्या गुणवत्तेवर पुढे गेला पाहिजे, अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे, असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.