साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:04 IST2025-12-17T17:04:08+5:302025-12-17T17:04:59+5:30

साताऱ्यातील ड्रग्ज कारवाईवरुन सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sushma Andhare has made serious allegations against Eknath Shinde regarding the drug bust in Satara | साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप

साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप

Sushma Andhare on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये १४५ कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. मात्र साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती लपवल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरीत गावातील एका रिसॉर्टमध्ये टाकलेल्या धाडीत ४५ किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे चालवत असल्याचा आरोप होत आहे. अशातच प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

१३ डिसेंबर रोजी मुंबई गुन्हे शाखेने साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात शनिवारी सकाळी छापा घालून मेफेड्रॉन अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. या कारवाईत एकूण सुमारे ११५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत विशाल मोरे या व्यक्तीसह त्याच्या सहा साथिदारांना अटक करण्यात आली. ९ डिसेंबर रोजी मुलुंडमध्ये दोघांकडून १३६ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. या दोघांच्या चौकशीतून विशाल मोरे आणि अन्य आरोपींची नावे पुढे आली. त्यानंतर सावरी गावातील ती जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची, नातेवाईंकांची असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र पोलिसांकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला होता. दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी ही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाची असल्याचा गौप्यस्फोट केला.

"रिसॉर्टजवळ असलेल्या शेडसाठी पक्का रस्ता तयार करण्यात आला होता. याची मागणी कुणी केली हा प्रश्न आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या शेडमध्ये तीन लोक राहत होते. हे शेड गोविंद नावाच्या व्यक्तीचे आहे. हे शेड ओंकार डिगेने चालवायला घेतलं होतं. त्या तिघांसाठी जेवण रिसॉर्टमधून जात होते. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांचे आहे. साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकांनी प्रकाश शिंदेंचा एकनाथ शिंदेंसोबत संबंध नसल्याचे सांगितले. सातबाऱ्याचा शोध घेतला असता त्यामध्ये सुभाष आणि प्रकाश शिंदे नाव सापडले. एकनाथ शिंदे यांच्या भावांची नावेही योगायोगाने तीच आहेत. रिसॉर्टचे नाव देखील तेजयश असं आहे. त्या गावातील एका बॅनरवर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातवाचा फोटो होतो. हे हॉटेल रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं आणि तो दरे गावचा सरपंच आहे," असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

"या प्रकरणात प्रकाश शिंदे यांचे नाव का लपवण्यात आलं हा माझा प्रश्न आहे. तो एकनाथ शिंदे यांचा भाऊ नसेल तर तो कोण आहे हे सांगा. शेडमधील लोक काय काम करतात हे प्रकाश शिंदे यांना माहिती नव्हतं का, ते माहिती असूनही ते त्यांना जेवण देत राहिले," असा आरोप अंधारे यांनी केला.

प्रकाश शिंदेंनी फेटाळले आरोप

"हे आरोप साफ खोटे आहेत. हे विरोधकांचे षडयंत्र आहे. ज्या ठिकाणी ड्रग्ज सापडले तेथून रिसॉर्ट तीन ते साडेतीन किमी लांब आहे. सुषमा अंधारे यांनी पोलिसांचा रिपोर्ट बघावा आणि त्यानंतर याबाबत चर्चा करावी. माझा त्या जागेशी काही संबंध नाही, सहा महिन्यापूर्वी मी रणजित शिंदे याला ते दिले होते. माझ्यावर जे आरोप झालेत ते चुकीचे आहेत आणि त्याबाबत पोलीस तपास करतील," असं प्रकाश शिंदे म्हणाले.
 

Web Title : शिंदे के भाई ड्रग मामले से जुड़े? अंधारे ने उप मुख्यमंत्री पर आरोप लगाया।

Web Summary : सुषमा अंधारे का आरोप है कि एकनाथ शिंदे के भाई के रिसॉर्ट में ड्रग्स मिले। सतारा में 115 करोड़ रुपये के ड्रग्स जब्त। प्रकाश शिंदे ने आरोपों को निराधार बताते हुए इसे साजिश करार दिया। पुलिस जांच जारी है।

Web Title : Shinde's brother linked to drug case? Andhare accuses Deputy CM.

Web Summary : Sushma Andhare alleges drugs found at Eknath Shinde's brother's resort. 115 crore worth drugs seized in Satara. Prakash Shinde denies allegations, calling it a conspiracy. Police investigation is underway to ascertain the truth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.