जालना - अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना केलेल्या मारहाणीचे पडसाद मराठवाड्यात उमटताना दिसत आहे. कृषिमंत्र्यांना पदावरून हटवावे अशी मागणी करणारे निवेदन देण्यास गेलेल्या घाडगे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर मराठवाड्यात ठिकठिकाणी छावा संघटनेचे कार्यकर्ते अजित पवारांच्या पक्षाविरोधात आक्रमक झाले आहेत. जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर या भागात छावा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
जालना येथे संतप्त झालेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयावर दगडफेक केली. जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांनी केला. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रात्री १२ च्या सुमारास हा प्रकार घडला. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथेही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण यांच्या फोटोला आसूड मारण्याचे आंदोलन केले. शहरातील क्रांती चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. लातूरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे मराठवाड्यात छावा संघटना आक्रमक झाली आहे.
तर लातूरमधील कालच्या घटनेनंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. धाराशिव येथेही राष्ट्रवादीच्या जिल्हा संपर्क कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. याठिकाणी पत्ते उधळण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनीही योग्य ती खबरदारी घेतली होती. इथल्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर सूरज चव्हाण आणि अजित पवारांचे फोटो फाडण्यात आले. तेव्हा राष्ट्रवादी कार्यकर्तेही समोर आले मात्र पोलिसांनी वेळीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, लातूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद पोलिस ठाण्याचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) एक पथक अशा दोन स्वतंत्र टीम सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले. छावा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, जोपर्यंत सूरज चव्हाण यांना अटक होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.