जयकुमार गोरेंच्या बदनामीत सुप्रिया सुळे, रोहित पवारही; पुरावे आहेत, चौकशी करू- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 07:26 IST2025-03-26T07:25:52+5:302025-03-26T07:26:50+5:30
हक्कभंग समिती ही दात नसलेला वाघ- देवेंद्र फडणवीस

जयकुमार गोरेंच्या बदनामीत सुप्रिया सुळे, रोहित पवारही; पुरावे आहेत, चौकशी करू- मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचा कट रचण्यात आला होता. त्यात संबंधित महिला आणि कथित पत्रकार तुषार खरात होते. गोरे यांच्या बदनामीचे व्हिडीओ तयार केल्यानंतर ते आधी खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, प्रभाकरराव देशमुख (माजी आयएएस) यांना पाठविले जात होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
एखाद्या नेत्याला आयुष्यातून उठवण्यासाठी असे करणे चुकीचे आहे. याची चौकशी होईलच पण सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. गोरे यांंना मी हिमतीची दाद देतो की त्यांनी लढा दिला. पण शरद पवार गटाचे नेते त्यांच्या बदनामीत सामील होते यांचे कॉल रेकॉर्ड्स आहेत, पुरावे आहेत, असा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला. मी पुराव्यानिशी सांगतो, प्रभाकरराव देशमुख हे शंभरवेळा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
मंत्र्यांविरोधात महिला स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे, त्यात माझे व सुप्रिया सुळे यांचे नाव घेण्याचे कारण काय? कुणी आम्हाला फोन केला तर तो विषय आम्ही समजून घेतो आणि मांडतो. गोरेंविरोधात लढणाऱ्या महिलेला मी आणि सुप्रिया सुळे ओळखत नाही. गोरेंविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याकडे आहेत. मुख्यमंत्री याची चौकशी करणार का? आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत.
-रोहित पवार, आमदार, शरद पवार गट
हक्कभंग समिती ही दात नसलेला वाघ
विधिमंडळातील सदस्यांविरुद्ध कोणी काहीही बोलतो, हक्कभंग समिती ही बिनदाताची वाघ बनली आहे. तीच ती माणसे सभागृहाविरुद्ध बोलतात, मंत्र्यांनी भयमुक्त वातावरणात काम करू नये यासाठी दबाव आणतात. सभागृहाचा अवमान केला म्हणून सनदी अधिकाऱ्यांनाही शिक्षा झालेली आहे. सभागृहाला कमी लेखण्याच्या प्रयत्नांविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.