आरोपीला दिलेली १ कोटींची कॅश आली कुठून? गोरे प्रकरणातल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 08:50 IST2025-03-26T08:16:13+5:302025-03-26T08:50:51+5:30

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात आरोप झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं

Supriya Sule responded to CM Devendra Fadnavis after allegations were made in the defamation case against Minister Jayakumar Gore | आरोपीला दिलेली १ कोटींची कॅश आली कुठून? गोरे प्रकरणातल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचा सवाल

आरोपीला दिलेली १ कोटींची कॅश आली कुठून? गोरे प्रकरणातल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule on CM Devendra Fandavis: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या कटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सभागृहात बोलताना  खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख आरोपींच्या संपर्कात होते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. या सगळ्याशी माझा काय संबंध? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचा कट रचण्यात संबंधित महिला आणि कथित पत्रकार तुषार खरात यांचा समावेश होता. मंत्री गोरे यांच्या बदनामीचे व्हिडीओ तयार केल्यानंतर ते आधी सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकरराव देशमुख यांना पाठवले जात होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. याची चौकशी होईलच पण सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. मी पुराव्यानिशी सांगतो, प्रभाकरराव देशमुख हे शंभरवेळा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत, असं देवेंद्र  फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. 

'गोरेंविरोधात कट रचणारे शरद पवार गटाच्या संपर्कात'; CM फडणवीसांनी दोन मोठ्या नेत्यांचं घेतलं नाव

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं. या सगळ्याशी माझा काय संबंध? १ कोटी रुपयांची रोकड मी पाहिली. याची चौकशी त्यांना करायची असेल तर मी पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नावे घेतली. त्यापैकी कुठल्याच व्यक्तीला मी भेटलेले नाही. मी त्यांना ओळखतही नाही. मला त्यांची नावेही माहिती नाहीत. माझं स्पॉट लोकेशन पत्रकारांनाही माहिती असतं. आजकाल तंत्रज्ञानामुळे, कॅमेऱ्यामुळे कोण कुणाला भेटलं ते लगेच स्पष्ट होतं. मी पारदर्शक आयुष्य जगते. मी कुणाला भेटलेली नाही. मला या विषयाची फारशी माहिती नाही," असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.

"माझ्यावर जो आरोप झाला त्याचे मला आश्चर्य वाटलं. माझं आयुष्य आणि माझा मोबाईल पूर्णपणे पारदर्शक आहे. मी पत्रकारांच्या सतत संपर्कात असते. सगळ्या पत्रकारांचे मला फोन येतात, त्यांनी केलेल्या बातमीचे व्हिडीओ माझ्याकडे येतात. तुषार खरातांना मी ओळखते का? तर नक्कीच मी ओळखते. त्यांचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे. त्यांनी माझी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी मुलाखत देखील घेतली आहे. अर्थातच मी त्यांना ओळखते. लोकं मला बातम्या पाठवतात. मी त्या फॉरवर्ड करते का? तर नाही," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"या प्रकरणामध्ये मी एक विधान केलेलं मला स्पष्ट आठवत आहे. ज्या महिलेवर १ कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाला, मला चिंता अशी होती की, १ कोटी रुपये कॅश आली कुठून? नोटबंदी झाली होती तेव्हा  सगळे बँकिंग सिस्टिममध्ये आले आहेत तर १ कोटी रुपये कॅश आले कुठून? मला चांगल आठवतंय मी प्रसार माध्यमांमध्ये बोलले होते की, मी सदर प्रकरण केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे घेऊन जाणार आहे. नक्की व्यवहार झाला कसा? हे सर्वांना समजले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये नाव घेतलेल्या कोणत्याही व्यक्तींला मी कधीही भेटले नाही. मी पारदर्शक आयुष्य जगते," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

Web Title: Supriya Sule responded to CM Devendra Fadnavis after allegations were made in the defamation case against Minister Jayakumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.