...तर पहिल्या दिवशी मी राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:58 IST2025-01-29T16:57:17+5:302025-01-29T16:58:04+5:30
या सरकारने नैतिकता ठेवून संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

...तर पहिल्या दिवशी मी राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला
मुंबई - तंत्रज्ञानाच्या युगात ५० दिवस झाले तरी एक खुनी मिळत नाही, तो फरार असेल, कुठे गेला, एआयमध्ये गेला का? ५० दिवसानंतरही फरार माणूस मिळत नसेल तर यंत्रणा काय करतेय असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. त्याशिवाय धनंजय मुंडे यांनाही राजीनाम्यावरून खोचक टोला लगावला.
आजच्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्यामुळे पक्षाची दररोज हेडलाईन होत असेल, तर नैतिकतेनं मी पहिल्याच दिवशी पक्षाकडे माझा राजीनामा दिला असता, मी इथं पक्ष वाढवायला आली आहे. पक्षाला अडचणीत आणायला नाही. माझ्यामुळे पक्षाची रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेतलं असतं. माझी इन्क्वायरी करा, दूध का दूध और पानी का पानी, होऊ द्या, असं मी केलं असतं असं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर त्या बोलल्या.
तसेच तंत्रज्ञानाच्या युगात ५० दिवस झाले, तरी एक खुनी मिळत नाही? तो फरार असेल, तर कुठे गेला? एआयमध्ये गेला का? देशमुख कुटुंबीय आणि राज्याची चेष्टा लावलीये का? ५० दिवसांनंतरही फरार माणूस मिळत नसेल, तर यंत्रणा काय करत आहे? हा गंभीर प्रश्न आहे. ५० दिवसांपूर्वी राज्यातील एका मुलाची हत्या झाली. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या कुटुंबासाठी न्याय मागत आहे. या सरकारने नैतिकता ठेवून संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, बीड प्रकरणावर चॅनलवर रोज एक नवीन पुरावा येत आहे, अजून काय पुरावे पाहिजेत? अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ या सर्वांना ऐकीव बातम्यांवर अटक झाली होती. या ऐकीव बातम्यांवर ते सर्व जेलमध्ये गेले होते. त्यांना वर्षे-वर्षे तुरुंगात राहावं लागलं होतं. संतोष देशमुख प्रकरणात तर अनेक पुरावे आहेत. सत्तेतले लोकही याबाबतचे आरोप करतायेत. आम्ही विरोधात आहोत, आम्हाला बाजूला ठेवा. पण, सत्तेतील तिन्ही पक्षाचे आमदार यावर बोलत आहेत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.