मराठा आरक्षणाला पाठिंबा, आमच्या ताटातलं घेऊ नका; सावरगावच्या मेळाव्यात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:56 IST2025-10-03T11:56:15+5:302025-10-03T11:56:47+5:30
आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, असे भावनिक आवाहन भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात करीत पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावर लक्ष वेधले.

मराठा आरक्षणाला पाठिंबा, आमच्या ताटातलं घेऊ नका; सावरगावच्या मेळाव्यात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन
पाटोदा । कुसळंब : मुंडे साहेबांचा वारसा चालवत असताना, प्रत्येक अठरापगड जातीसाठी मी लढणार आहे. त्यांनी मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही, उलट समर्थन दिले. त्यामुळे आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, असे भावनिक आवाहन भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात करीत पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावर लक्ष वेधले.
पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे गुरुवारी दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे या बोलत होत्या. यावेळी आमदार धनंजय मुंडे, प्रा. लक्ष्मण हाके, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार नमिता मुदंडा, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदी उपस्थित होते.
नका खोटे धंदे करू, नका गुंड पाळू, दोन घास कमी खा; पण स्वाभिमानाने राहा. कुणाचे तुकडे उचलू नका, कुणाचे पैसे घेऊ नका, खोटे काम, खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. रक्तबीजासारखे राक्षस संपविण्याची शक्ती आम्हाला दुर्गा देवीने द्यावी, असे पंकजा मुंडे यांनी देवीला साकडे घालत जातीय राजकारणावर प्रहार केला.
या ताटातले काढून त्या ताटात जाऊ देणे योग्य नाही
मराठा समाजाला आरक्षण दिले, याचा आम्हाला आनंद आहे; पण काही जणांना आरक्षणाच्या आडून ओबीसीतून आरक्षण घ्यायचे आहे. हे कुणाला फसवत आहेत? स्वतःला खुर्ची मिळावी, यासाठी सुरू आहे. सरकारने सर्व काही केले, आता या ताटातले काढून त्या ताटात जाऊ देणे हे योग्य नाही, असे आमदार धनंजय मुंडे म्हणाले.
म्हणे ‘कराड आमचे दैवत’ गर्दीत झळकले पोस्टर्स
सावरगाव येथील दसरा मेळाव्यात ‘वी सपोर्ट कराड’ आणि ‘कराड आमचं दैवत’ अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळाले. व्यासपीठावरून निवेदकाने विशेष सूचना करीत फक्त संत भगवान बाबा, लोकनेते गोपीनाथराव मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांचे फोटो दाखवा, इतर कोणाचेही पोस्टर्स झळकवू नका, चुकीचा मेसेज जाईल, असे बजावले.