राज्यावर सूर्य कोपला! तापमानाचा पारा ४५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 06:26 IST2019-04-27T06:26:31+5:302019-04-27T06:26:44+5:30

पुण्यात शतकातील सर्वोच्च तापमानाची नोंद

The sun rises on the throne! Temperature humidity 45 | राज्यावर सूर्य कोपला! तापमानाचा पारा ४५ वर

राज्यावर सूर्य कोपला! तापमानाचा पारा ४५ वर

पुणे : हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात व मध्य महाराष्ट्रावर असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने राज्यात उष्म्याची लाट आली आहे. पुणे शहरात गेल्या शतकातील सर्वोच्च ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सरासरी तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान असून, अजून ही स्थिती दोन दिवस कायम राहील. त्यानंतर तापमानात किंचितशी घट होईल, मात्र राज्याचा पारा चाळीच्या आसपासच राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला. राज्यात सर्वत्र कमाल आणि किमान तापमानातही चार ते पाच अंशांची वाढ नोंदविण्यात आली. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानाचा पारा देखील वीस अंशांपुढेच राहणार आहे. त्यामुळे दिवसाबरोबर रात्रदेखील उष्म्याचीच असेल. राज्यात अकोला येथे सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथील किमान तापमानाचा पारादेखील २९.७ अंश सेल्सिअसवर आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत तापमान ४५च्या वर गेले असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशादरम्यान आहे.
राज्यात सर्वत्र कमाल तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर असल्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यातील तापमान
पुणे ४२.६, अहमदनगर, ४४.९, जळगाव ४४.४, कोल्हापूर ४१, महाबळेश्वर ३६.१, मालेगाव ४३.२, नाशिक ४१.७, सांगली ४३, सातारा ४१.६, सोलापूर ४४.३, उस्मानाबाद ४३.८, औरंगाबाद ४३, परभणी ४५.७, नांदेड ४४.५, बीड ४४.२, अकोला ४६.४, अमरावती ४५.४, बुलडाणा ४३.१, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४३.८, नागपूर ४५.२, वाशिम ४४.२, वर्धा ४५.७, यवतमाळ ४४.५.

Web Title: The sun rises on the throne! Temperature humidity 45