साखर हंगाम निम्म्यावर...कारखानदार गॅसवर...!
By Admin | Updated: January 20, 2015 23:42 IST2015-01-20T22:22:32+5:302015-01-20T23:42:07+5:30
सव्वाचार कोटी टन गाळप : अजून तेवढाच ऊस शिल्लक

साखर हंगाम निम्म्यावर...कारखानदार गॅसवर...!
विश्वास पाटील - कोल्हापूर -राज्यातील साखर हंगाम निम्म्यावर व बाजारातील साखरेचे दर घसरल्याने कारखानदार मात्र गॅसवर अशी साखर उद्योगाची आजची स्थिती आहे. केंद्र सरकार या उद्योगास पॅकेज देणार आहे परंतु ते नेमके कधी पदरात पडते यासंबंधी कोणतीच ठोस माहिती नसल्याने कारखानदार गॅसवर आहेत.
साखर आयुक्तालयाने राज्यातील १८ जानेवारीपर्यंतची हंगामाची गाळपाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार राज्यात ७६ खासगी कारखान्यांसह १७४ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत ४१९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ४४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.६८ असून तो गतवर्षीच्या तुलनेत पाँईट १० ने जास्त आहे.
राज्य शासनाने हंगामाच्या सुरुवातीस किमान ६९७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट जाहीर केले होते, परंतु परतीचा पाऊस व हवामानही उसाला पोषक राहिल्याने आतापर्यंत गाळप झालेल्या पूर्वहंगामी, आडसाली व सुरू या तिन्ही प्रकारांतील लागणीला चांगले टनेज मिळाले आहे. शासनानेच यंदा ८०० लाख टन उसाचे गाळप होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. या पुढील गाळप हे मुख्यत: खोडवा उसाचे असेल. त्यामुळे त्यास लागणीइतके प्रतिएकर टनांचे उत्पादन मिळणार नाही तरीही आठशे लाख टन गाळप विचारात घेतल्यास यंदाचा हंगाम मार्चअखेरपर्यंत सुरू राहील. काही कारखाने एप्रिलपर्यंत व अगदी मोजके मेपर्यंत सुरू राहतील.
यंदा ऊस चांगला आहे परंतु बाजारातील साखरेने सगळे वांदे केले आहे. हा दर २५०० रुपये क्विंटलपर्यंत घसरल्याने कारखान्यांना एफआरपी देताना अडचणी आल्या आहेत.
राज्य सरकार एका बाजूला मदतीसाठी प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला कारखान्यांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. त्यामुळे ही मदत झाली तरच कारखानदारांची अडचण दूर होईल. अन्यथा मोजके कारखाने वगळता सर्वांचेच आर्थिक ‘आजारपण’ वाढणार आहे.
दृष्टिक्षेपात १८ जानेवारीअखेरचे राज्यातील गाळप
विभागकारखाने सुरूगाळप साखर उत्पादन साखर उतारा
(कंसात खासगी)(लाख टन)(लाख क्विंटल) (टक्के)
कोल्हापूर३७(१०)९६.९२११५.४६११.९१
पुणे५७ (२६)१६४.७८१७४.६२१०.६०
अहमदनगर२३(०९)५८.२२६०.८११०.४४
औरंगाबाद२२ (०९)३७.२२३४.७७०९.३४
नांदेड२९ (१७)५७.०१५७.२११०.०४
अमरावती०२ (०१)०२.६९२.५९९.६५
नागपूर०४ (०४)०२.२२२.०२९.०७
एकूण१७४ (७६)४१९.०६४४७.४७१०.६८