“गाडीचे नट बोल्ड लूज केले, अपघात घडवण्याचा कट होता, आम्हाला पण धमकी मिळते”: मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 19:30 IST2023-08-03T19:25:43+5:302023-08-03T19:30:22+5:30
Sudhir Mungantiwar: भाजपच्या अनेक नेत्यांना अशी धमकी येते. आता ATS ने पण सांगितले आहे की, सावध रहा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

“गाडीचे नट बोल्ड लूज केले, अपघात घडवण्याचा कट होता, आम्हाला पण धमकी मिळते”: मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशोमती ठाकूर यांना संरक्षण पुरवण्याचे आश्वासन दिले. यानंतर भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या गाडीचे नट बोल्ट लूज केले होते. अपघात घडवण्याचा कट होता, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
आम्हाला पण धमकी मिळते. पण आम्ही मग काही मीडियाला सांगत नाही. आम्ही पोलिसांकडे जातो. तो विषय पोलिसांचा आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना धमकी दिली जाते. पण आम्ही कधी मीडियात जात नाहीत. माझ्यापण गाडीचे नट बोल्ड लूज केले होते. अपघात घडवण्याचा कट होता. पण मी मीडियाकडे गेलो नाही. माझ्या गाडीचे सर्व नटबोल्ट काढले होते. मी कंपनीत विचारले तर ते म्हणाले, असे कधीच होऊ शकत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांना अशी धमकी येते
भाजपच्या अनेक नेत्यांना अशी धमकी येते. आता ATS ने पण सांगितले आहे की, सावध रहा. आम्हाला सूचना केल्या. कोणतीही लिंक आली की त्या ओपन करायची नाही. याची आम्हाला भीती नाही पण काळजी घ्यायला हवी. दहशतवाद विरोधी पथकाने सर्वांना सांगितले आहे. विरोधकांना पण सांगितले आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्या विमानात अजून जागा आहे. सबका साथ सबका विकास. आमच्यासोबत अजून काही जण येणार आहेत. याआधी जे विरोधी पक्षनेते झाले ते विरोधी बाकावरुन सत्ताधारी बाकावर आले आहेत, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यासंदर्भात दिली.